पालिकांची प्रभाग रचना तातडीने करा, महापालिकांना शासनाचे आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि बदललेल्या प्रभाग रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना, मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा प्रारूप तातडीने बनविण्याच्या सूचना ठाण्यासह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिल्या.
त्यामुळे नवीन वर्षात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होऊन लागलेली प्रशासकीय राजवट आजही कायम आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निवडणुका होण्याची शक्यता वाटत असताना ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आणि सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका घेतली आणि ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. पुन्हा निवडणुका रखडल्या. त्यादरम्यान शिवसेना फुटली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पुन्हा प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय झाला आणि तेही प्रकरण न्यायालयात पोहोचले. परिणामी, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका आणि 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता 28 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल आणि त्याच्या निर्णयावर निवडणुकांच्या तारखा अवलंबून असतील. या सुनावणीला पाच दिवस उरले असताना, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सर्व आयुक्तांना पत्र पाठवून राज्य सरकारने सुधारित केलेल्या तरतुदीप्रमाणे मुदत संपलेल्या आणि नजीकच्या काळात मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभाग संख्या आणि प्रभाग रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नव्या वर्षात निवडणुका शक्य
ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, नागपूर, पिपरी चिंचवड, पुणे, नाशिक, भिवंडी आदी मुदत संपलेल्या 15 महानगरपालिका आणि इतर महापालिका आयुक्तांना नगरविभागाने आदेश दिछले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात महापालिकांच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.