क्रांतीची स्फुर्ती देणारे उमरी हुतात्मा स्मारक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आज आपण 9 ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्यपुर्व इतिहासाचे अवलोकन केल्यास भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या स्वातंत्र्य चळवळीत यवतमाळ जिल्हा आघाडीवर राहीला आहे. राष्ट्रीय विचारांनी भारलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींची परंपरा यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहे.
1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत देशासाठी प्राणाहुती देऊन हौतात्म्य पत्कारणाऱ्या यशवंत लुबडाजी पाळेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या ज्ञात व अज्ञात सेनानींची आठवण म्हणुन त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळ बाभुळगाव रोडवरील उमरी या त्यांच्या राहत्या गावात शासनाद्वारे 1980 मध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आले.
गांधीजींनी वैयक्तीक सत्याग्रहाचे आवाहन केल्यानंतर यवतमाळ येथून श्रावणजी उमरतकर यांच्या नेतृत्वात 17 फेब्रुवारी 1941 रोजी पहिली तुकडी पदयात्रेला निघाली होती. यात यशवंत पाळेकर तसेच आनंदराव देशपांडे, सदाशिवराव तायडे हे देखील होते. विशेष म्हणजे यशवंतराव पाळेकर एका पायाने अंपग असतांनाही त्यांचा उत्साह पाहून सर्वांना त्यांच्या जिद्दीचे फार कौतुक वाटायचे. यशवंतराव पाळेकर यांनी सर्वांना वैयक्तिक सत्याग्रहात सामिल व्हा असे आवाहन करत यवतमाळ, बाभुळगाव, देवगाव, चांदुर रेल्वे मार्गे हुशंगाबाद पर्यंतचे 247 मैलाची पदयात्रा पुर्ण केली. नर्मदा नदी पार करत असतांना हुशंगाबाद पोलीसांनी त्यांची रवानगी तुरूंगात केली. तुरूंगातून मुक्त झाल्यावर आनंदराव देशपांडे यांचे समवेत ते पुन्हा पदयात्रेवर निघाले होते. या दोघांना ब्राम्हणघाट येथे पोलीसांनी अटक करून दीड महिण्यासाठी नागपूर तुरूगात टाकले होते.
1942 च्या चले जाव चळवळीच्या दरम्यान महात्मा गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. पोलीसांनी त्या आंदोनलात सामील यशवंत पाळेकर यांना पकडून तुरूंगात डांबले. त्यांच्यासह जवाहरलाल दर्डा, दादा राऊत, रघुनाथ मुंडे, मेघराज छल्लानी, शंकरलाल शिवलाल, उमरतकर, वणीचे बापूराव देशपांडे, विठ्ठलराव किटकुले, अब्दुल बारी, लक्ष्मणराव सातोकार, दिग्रसचे बालाजी नालमवार, ढोले, स्वामी, डॉ. भोंगाडे, पुसदचे गोदाजीराव मुखरे, जेठमल माहेश्वरी, सटवाराव नाईक, दारव्ह्याचे सदाशिवराव तायडे यांच्यासंह अनेकांना इंग्रज सरकारने अटक केली. तुरूंगात असतांना यशवंतराव पाळेकर यांची प्रकृती बिघडली, तेव्हा माफीनामा लिहून दिल्यास उपचारासाठी तुरूंगाबाहेर जाऊ देण्यात येईल असे तुरूंग अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. मात्र पाळेकर यांनी माफीनामा लिहून देणार नाही, असे ठाम सांगितले. पुढे त्यांची प्रकृती जास्तच खालावली व 26 सप्टेंबर 1942 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
आपली प्राणज्योत स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला अर्पण करणारे यशवंत पाळेकर, 1857 च्या लढ्यातील क्रांतीकारक बैरागीबाबाच्या वेशात दारव्हा येथे वास्तव्याला असणारे रंगोजी बापू गुप्ते, हरिकिशोर या यवतमाळच्या पहिल्या वृत्तपत्रातून क्रांतीचा लढा जोपासणारे पृथ्वीगीर हरिगीर गोसावी, जगात पहिला जंगल सत्याग्रह करणारे लोकनायक बापूजी अणे, यांच्यासह बाबासाहेब परांजपे, बळीराम एकबोटे, गणपतराव माळवी, बाळाभाऊ धर्माधिकारी, के.एल.पेशवे, वाय.के.देशपांडे, दत्तात्रय कारणे, डॉ. सिद्धार्थ काणे, अण्णासाहेब जतकर, ॲड. भावे, मारोतराव शेटे, विनायक शिलेदार, बाबुराव रापर्तीवार, भिमासा बागडे, श्रीमती सुलोचना बोबडे, मुकान्मा तेलंगल, सरस्वतीबाई बदकुले, सोनी जाधव, दादाराव येळणे, गंगाराम सिडाम, चंपालाल मोहता गंगाबाई माडेवार, लक्ष्मीबाई हिंगणे, रघुनाथ मुडे, पांडुरंग देशपांडे, नारायण कळाळे, गणेश परांजपे, तारिणीबाई बुटे, गुलाबराव पोहेकर, पांडूरंग जोशी, विठ्ठलराव देशमुख, अण्णाजी गोरे, प्राणजीवन जानी, अंजनाबाई तायडे, विठोबा जामनकर, ताराचंदे सुराणा, दामोधर गाडे, वासुदेव इंगोले, चंपालाल बारूंदीया, शेख करीम शेख शरीफ, उद्धवराव माळवी, तुकारामजी डगवाल, विश्वनाथ सारस्वत, शंकरराव सुलभेवार, मारोतराव सुलभेवार, ब्रिजमोहन मोर, रामनाथ चपेरीया, रुपचंद शहा, माधवराव काळे, कमलाबाई भारती, ओंकार दिवे, नंदलासल तिवारी, श्रीरंग पसारकर, गणपत चिंचमलातपुरे, भाऊराव दौलतकर, वासुदेव आष्टेकर, सदाशीव विठाळकर यांचेसह खुप मोठी यादी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ज्ञात व अज्ञात क्रांतीकारकांनी आपआपल्या परीने इंग्रज सत्तेपासून देशाला स्वतंत्र्य करण्यासाठी क्रांतीची मशाल सतत तेवत ठेवली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अनेकांची हौतात्म्य पत्करले. त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जपणाऱ्या आणि युवा पिढीला स्फूर्ती देणाऱ्या उमरी येथील हुतात्मा स्मारकाच्या माध्यमातून सर्व आदरणीय क्रांतीकारकांना क्रांतीदिनामित्त नमन व विनम्र आदरांजली !…
– गजानन जाधव,
जिल्हा माहिती कार्यालय,
यवतमाळ.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…