सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असतानाच “वर्षा” वर मोठी घडामोडी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 4 ऑगस्ट :- सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या भवितव्यावर सुनावणी सुरू असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाहून मोठी घडामोड समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे, त्यामुळे आता शिंदे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार हिलमधल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आहेत, पण आता ते वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल विचारला जातोय कारण अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पुर्ण झाली आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देवगिरी या बंगल्यावरच राहणार आहेत. 1999 पासून ते 2014 पर्यंत म्हणजेच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती तोपर्यंत अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहत होते. 2019 ला महाविकासआघाडी सरकार आल्यानंतरही अजित पवारांना हाच बंगला देण्यात आला. आता महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवारांनी देवगिरी बंगला आपल्याकडेच राहावा, म्हणून विनंती केली होती.
सरकारने अजित पवारांची ही विनंती मान्य केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2019 ला सत्तांतर झाल्यापासून सागर बंगल्यावर राहत आहेत. अजित पवारांप्रमाणेच फडणवीस यांनीही 2019 साली सागर बंगल्यासाठी आग्रह केला होता, त्यावेळीही सरकारने फडणवीसांना सागर बंगला दिला होता. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून रखडला आहे. एका महिन्यानंतरही शिंदे आणि फडणवीसच राज्याचा कारभार हाकत आहेत. लवकरच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांनाही नवीन सरकारी बंगले द्यावे लागणार आहेत.