राज्यभर पावसाची विश्रांती ; ४ ऑगस्टपर्यंत परिस्थिती कायम ; हवामान विभागाचा अंदाज…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असून विदर्भात काही प्रमाणात पाऊस पडत आहे. तर, ३१ जुलैपासून ते ४ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे काही प्रमाणात विश्रांतीची आणि विदर्भात किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
संपूर्ण राज्यभरात जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली. यावेळी वार्षिक पावसाची तूट भरून निघाली. परंतु, १५ जुलैनंतर पावसाने दडी मारली. एक-दोन मोठय़ा सरी बरसून संपूर्ण दिवसभर पाऊस विश्रांती घेऊ लागला होता. आता ४ ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस होणार नाही, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी मध्य महाराष्ट्रातील व मराठवाडय़ातील जिल्ह्यात क्वचितच आणि अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होऊ शकतो.
जमिनीवर हवेचा दाब वाढल्याने समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यास अडथळा निर्माण झाला आहे. वाऱ्याची दिशा बदलली आहे. उत्तर आणि वायव्य दिशेकडून वारे वाहत असून अशी स्थिती परतीच्या पावसाची असते. नैऋत्येकडील वारे कमी झाले आहेत. त्यामुळे कोकणातील सर्वच जिल्ह्यात दरदिवशी एखादी पावसाची किरकोळ सर येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाडय़ात उघडीप असणार आहे. तर, या विभागातील काही जिल्ह्यात अल्पशा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारे उत्तरेकडून येत असल्याने विदर्भातील काही भागांत किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
पाऊसभान..
मुंबईसह कोकणातील ४, विदर्भातील १० जिल्ह्यात व दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात तशीच अवस्था आहे. पावसाची तीव्रता थोडी अधिक असल्यामुळे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.