एकनाथ शिंदेंना मोठा झटका ; आता ठाणे कोर्टात याचिका दाखल ; 1 ऑगस्टला होणार सुनावणी…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे, 29 जुलै :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे कोर्टात याचिका दाखल झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्य शिवसेनेतून बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात अपात्रतेच्या कारवाई करण्याबाबतची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टात 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. हे प्रकरण ताजं असताना आता ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याचिका दाखल झाली आहे. एकनाथ संभाजी शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी सायंकाळी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
आणि 7 जुलै 2022 रोजी मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणाची पूजा करत आपल्या कारभाराला सुरवात केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात केलेली सत्यनारायणाची महापूजा ही घटनेच्या विरोधात असल्याचा आरोप करत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी ही येत्या 1 ऑगस्ट रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यघटनेला अनुसरून धर्मनिरपेक्षतेने देशाचा, राज्याचा संपूर्ण कारभार भारतीय राज्यघटनेनुसार चालवण्याची शपथ राज्यपालांच्या साक्षीने घेतली. मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे. त्यांनी कोणत्याही धर्माची, पंथाची बाजू न घेता, कोणत्याही धार्मिक वादाला अनुसरून काम करणार नाही, असं अपेक्षित आहे. असे असताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करताना 7 जुलै 2022 रोजी आपल्या दालनात सत्यनारायण पूजन केली.
हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध अवमान करणारे आहे. भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही, असा दावा तक्रारदार धनाजी सुरोसे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे धर्मनिरेक्षतीत असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, असा दावा सुरोसे केला आहे.
त्यामुळे भादवि कलम 406 प्रमाणे एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत. शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे, असं सुरोसे यांचं म्हणणं आहे. त्यांच्या तक्रारीवरुन शिंदेंविरोधात तक्रार क्रमांक १६७६/२०२२ प्रमाणे मे न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी ठाणे यांच्या न्यायालयात सुरोसे तक्रार नोंद करण्यात आली आहे.