आणखी एक ठाकरे गेले विरोधात…? ; सत्तातरानंतर स्मिता ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 26 जुलै :- एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बंडखोर आमदार पुन्हा स्वगृही परततील असं बोललं जात होतं.
मात्र, दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दुरावा वाढतानाच दिसत आहे. अशात आता ठाकरे एकाकी पडताना दिसत आहे. कारण, शिंदे गटासोबत आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. भाजपच्या नेत्यांकडून शिंदे गटासाठी बॅटींग करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे भावकी असलेले ठाकरे देखील आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे राहताना दिसत आहे. अशा परिस्थितीत स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भेटीचं कारण गुलदस्त्यात काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शिंदे गटाची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांचे वाभाडे काढले.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस देखील राज यांच्या भेटीला गेले होते. अशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
मात्र, या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. यावेळी स्मिता ठाकरे यांच्यासोबत वेलनेस अंबेसिडर रेखा चौधरी आणि नंदुरबार माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे गटासाठी भाजपची बॅटींग शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून रोखठोक भूमिका मांडली. यावेळी ठाकरेंनी शिंदे गटावर चौफेर टीका केली. यानंतर शिंदे गटाकडून आमदार क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, आज शिंदे गटासाठी भाजपने जास्त बॅटींग केल्याचे पाहायला मिळाले. आधी भाजप आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही वेळापूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. राणे यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.