पुणे जिल्ह्यात शिकाऊ विमान कोसळले ; अन् युवकांनी घेतली धाव…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- इंदापूर तालुक्यात एक शिकावू विमान कोसळल्याची घटना आज (सोमवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात पायलट भाविका राहुल राठोड (वय २२ वर्ष रा.पुणे) किरकोळ जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कडबनवाडी येथील शेतकरी दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात विमान कोसळले. या अपघातात पायलट युवती किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. बारामती येथील हे शिकाऊ विमान घेऊन तरुणी सराव करत होती. पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. विमान पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान आहे. या संस्थेमार्फत वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. विमान शेतात पडल्याचे पाहताच परिसरातील युवकांनी या ठिकाणी धाव घेतली. शिकाऊ महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बारामती येथून अधिकारी आणि सबंधित संस्थेचे अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहचले आहेत. दरम्यान हे विमान कोसळलेले नसून, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून, पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे.