शिवसेनेला पुन्हा मोठा झटका ; कृषी मंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 23 जून :- राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबत एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आता शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला जावून मिळाले आहेत.
दादा भुसे गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathore), आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak), किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक (Sachin Naik) हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. विशेष म्हणजे दादा भुसे यांच्यासह इतर आमदारांच्या आगमनानंतर रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर पोलिसांचा प्रचंड फौजफाटेसह बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दोन आमदारांची प्रतिक्षा होती. हे दोन्ही आमदार आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या गुवाहाटीत दाखल झाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे.
शिंदे गटाची एक अपेक्षित संख्या पूर्ण होणार आहे. त्यांच्या गोटात सकाळपासून 35 आमदार दाखल होते. केसरकर जेव्हा आले तेव्हा तो आकडा 35 झाला होता. पण त्यांना 37 आकड्यांची प्रतीक्षा होती.
आता दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या जाण्याने शिंदे गटाचा 37 आकडा पूर्ण झाला आहे. तर 9 अपक्ष आमदार आहेत. शिंदे गटाला स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी 37 आकड्यांची आवश्यकता होती. तो आकडा या गटाने पार केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करु शकतात. ते राज्यपालांना त्या संदर्भातील माहिती फॅक्सद्वारे देऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर रातोरात निर्णय होऊ शकतो. कारण दोन आमदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. त्यांच्या स्वाक्षऱ्या नंतर रात्रभरात पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.