शिक्षणातूनच होईल आदिवासी कोलामांचा उत्कर्ष :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.१८ जून :- आदिवासी कोलाम समाजाने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असून आपल्या पुढील पिढीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षित करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्या द्वारे आयोजित कोलाम सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व शेतकरी स्वावलंब मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माझी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, आदिवासी विकास विभागाच्या सचिव रचना मेश्राम, नगराध्यक्ष वैशाली नहाते, पुसद प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की आपल्या संस्कृतीतून मिळालेले संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. यासाठीच कोलाम सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी समाजाचा मूलभूत विकास साधण्याचे काम करण्यात येते. कोलाम समाजासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात त्याचा कोलाम समाजाने लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आदिवासींच्या आरोग्य तपासण्या व्हाव्यात, त्यांना घरकुल व वनपट्टे प्राधान्याने मिळावे, कोलाम समाजाला शासकीय नोकरीत दोन टक्के आरक्षण मिळावे तसेच शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली.
वसंतराव पुरके यांनी आदिवासी समाजाने मोठी स्वप्न बघण्याचे व आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यांनी प्रशासनातर्फे आदिवासींना घरकुल व दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच आदिवासींच्या जमिनी बळकावणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.
पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विवेक जाॅनसन यांनी कोलाम संस्कृतीचे जतन करण्यासाठी कोलाम सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. आदिवासी समाज सर्व कलागुणांनी समृद्ध असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी कोलाम समाज संघटनेचे अध्यक्ष राहुल आत्राम व कोलाम समाज सुधारक लेटूजी जुनघरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी गोदाजी सोनार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन रुपेंद्र लोखंडे यांनी केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी कबड्डी खेळाच्या स्पर्धेचे उद्घाटनही केले.
कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी एम. के. ऊके, गोवर्धन तेलंग, प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी संग्राम पवार, तहसीलदार श्री. बिजवे, गिरीश जोशी, प्रशांत लोखंडे, चंद्रशेखर मडावी, कोलाम समाजाचे विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी, खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.