मोठी बातमी ; गुणवंत सदावर्ते मारणार राजकारणात एन्ट्री ; निवडणूक देखील लढवणार…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी संपाचे वकील गुणरत्न सदावर्तें यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आता एसटी बँकेची निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे.
एसटी विलीनीकरणाच्या संपानंतर आता सदावर्ते यांनी आता एसटी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत. याकरता सदावर्ते स्वतःचे पॅनल उभं करण्याच्या तयारीत आहेत.
26 एप्रिलला जामिनावर बाहेर पडल्यानंतर आता ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. एसटी बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते स्वतःचे पॅनल उभे करणार असून त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. राज्यात एसटी बँकेचे तब्बल 90 हजार मतदार आहेत. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी आपले शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी एसटी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एसटी संपात हजारो कामगारांवर कारवाई झाली. त्यामुळे हजारो सदस्यांना मतदान करता येणार नाही. या कारणामुळे त्यांनी पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे.
तर, दोन हजारपेक्षा अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय चुरस पाहायला मिळते. सध्या एसटी बॅंकेवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला सदावर्ते कसे आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी हक्काची मानल्या जाणाऱ्या एसटी बॅंकेत जवळपास 90 हजार सदस्य असून राज्यभरात याच्या 50 शाखाही आहेत. तर दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. पण गेल्या सहा महिन्यांपासून एसटी संपामुळे हजारो कर्मचाऱ्यांना पगारच मिळाला नाही. त्यामुळे बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही कर्जाचे हप्तेच भरता आले नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते न भरलेल्या अशा कर्मचाऱ्यांचा बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकारही हिरावला जाणार आहे.