फडणवीसांची पुन्हा मुंबईत होणार जाहीर सभा ; तारीख ही ठरली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नुकतीच भाजपने मुंबईमध्ये 1 मे रोजी बूस्टर सभा घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा भाजपातर्फे दुसऱ्या जाहीर सेभेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 15 मे रोजी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गोरेगाव येथे जाहीर सभा घेणार असून, यावेळी ते कुणावर तोफ डागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत. त्यात आता पुन्हा भाजपने त्यांच्या दुसऱ्या सभेची तारीख जाहीर केली आहे. त्यात फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये यासभेचे आयोजन करण्यात आल्याचे भाजपकडून (BJP) सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे 14 मे रोजी शिवसेनेकडून (Shivsena) मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपनेदेखील सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर नेमकं काय बोलणार हे महत्त्वाचे आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी 14 मे रोजी केलेल्या भाषणावर फडणवीस त्यांच्या खास शैलीत कसे उत्तर देणार हे समोर येणार आहे. दरम्यान, भाजपतर्फे मुंबईत भाजपची या महिन्यातील दुसरी मोठी सभा असणार असून, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.