रवी राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर डागली तोफ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ऑनलाइन शाळादेखील ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. आता तरी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइनपेक्षा राज्यात फिरावे असा हल्लाबोल अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे.
आमच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने झाली असून देशातील जनता हे पाहत असल्याचे त्यांनी म्हटले.
राजद्रोहाच्या आरोपात अटक झालेले अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांची 12 दिवसानंतर तुरुंगातून सुटका झाली. नवनीत राणा या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, ज्या राज्यांमध्ये महिलांचा सन्मान केला जातो. त्या महाराष्ट्रात एका महिलेला चुकीची वागणूक दिली. सहा दिवसांआधी नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नव्हते. त्यांना त्रास देण्यात आल्याने त्या दु:खी असल्याचे रवी राणा यांनी म्हटले.
महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दडपशाही कधी झाली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई झाली असून सरकारकडून एका महिलेचा मोठा अपमान झाला असल्याचा आरोप राणा यांनी केला. तुरुंगात नवनीत राणांना दिलेली वर्तवणूक अयोग्य होती. तुरुंग प्रशासन राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. तुरुंग प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या आदेशाने त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राज्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत असे समजले आहे. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वीज, खतं, उद्योगधंदे यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑनलाइन शाळादेखील ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री अजूनही ऑनलाइन येतात. राज्यात त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरावे असे रवी राणा यांनी म्हटले. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की नाही असा प्रश्न लोकांना पडला असल्याचे त्यांनी म्हटले.
महापालिकेची कारवाई सूडबुद्धीने
मुंबई महापालिकेची नोटीस ही राजकीय सूडबुद्धीने बजावली असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. महापालिकेच्या पथकाने दोनदा आमच्या घरावर नोटीस दिली आहे. 15 वर्षाआधीची ही इमारत आहे. त्यावेळी विकासकाला मंजुरी दिली होती. आता अचानक महापालिकेला अनधिकृत काय दिसले, असा प्रश्नही त्यांनी केला. आपण महापालिकेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.