कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ जपण्यासाठीजिल्हा प्रशासनाचे ‘आय विल केअर’ ; शेतकरी व गरजू नागरिकांनीही समुपदेशनाचा लाभ घ्यावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; यवतमाळमध्ये राबविणार पायलट प्रोजेक्ट ; शारीरिक दुखण्याप्रमाणेच मनाचेही दुखणे असू शकते ; चॅट बॉट द्वारे ऑनलाईन समुपदेशन ; घरबसल्या आपली मानसिक स्थिती जाणून घ्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि . ४ मे, :- अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाद्वारे ‘आय विल केअर’ हे ऑनलाइन अप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक यांनी देखील या विनामुल्य सेवेचा लाभ घ्यावा व आपले मानसिक आरोग्य तपासून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समुपदेशन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना समर्थपणे समोर जाणे प्रत्येकाला जमत नाही किंवा त्यावर समाधानकारक मार्ग सापडत नाही. जसं शारीरिक दुखणे असते, तसेच मनाचेही दुखणे असू शकते. पण मनाचे दुखने दिसत नाही आणि पटकन लक्षातही येत नाही. मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या भावनांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे. एखाद्या तज्ञ मानसशास्त्रीय सल्लागाराची मदत घेतली तर मनावरचा ताण कमी होऊन समस्येवर निश्चितपणे तोडगा काढता येऊ शकतो. मात्र या संदर्भात अशी जागरूकता नाही उलट अनेक गैरसमज लोकांमध्ये आढळतात. मनोविकार तज्ज्ञाकडे जाणे ही सामाजिक प्रतिष्ठेआड येणारी बाब समजली जाते. शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारांवर देखील तात्काळ औषधोपचार मिळवणे आवश्यक असते.
मानसिक आरोग्याचे आणि आजारांवरील औषधोपचाराचे महत्व लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात विविध विभागात काम करणारे अधिकारी तथा कर्मचारी, शेतकरी व
नागरिकांकरीता आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई तथा ई-सायक्लिनिक ( Epsyclinic) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “I WILL CARE” (आय विल केअर) हे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. यवतमाळमध्ये हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे.
या पोर्टलवर जिल्ह्यातील कोणीही नागरिक त्याच्याजवळ असलेल्या स्मार्ट फोनद्वारे मानसिक आजारांबाबत माहिती घेवू शकतो. तसेच जर व्यक्तीला स्वतःबाबत आरोग्य कल्याण निर्देशांक, नैराश्याची, चिंतेची स्थिती जाणून घ्यायची असेल तर या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे व्यक्ती स्वतःच्या आरोग्य कल्याण निर्देशांक, नैराश्य आणि चिंता रोग याबद्दल स्मार्ट फोन द्वारे जाणून घेवू शकतो.
केलेल्या तपासणीत जर व्यक्तीला मानसिक आजार आढळल्यास त्याला त्याच ठिकाणी लगेच चॅट बॉट द्वारे ऑनलाईन समुपदेशन तथा मनोचिकित्सा सुद्धा सुरु करता येईल. या करिता गूगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर वरून आय विल केअर बाबतचे अॅप डाउनलोड करून घेता येईल. ही सुविधा दररोज 24 तास सुरु राहणार असून सदर सेवा ‘आय विल केअर’ च्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सुद्धा घेता यईल.
यात सर्वप्रथम सदर गूगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर वरुन ‘आय विल केअर’ हे अॅप डाऊनलोड करावे. अॅप ओपन केल्यावर स्क्रीन वर वरील स्किप यावर क्लिक करा. यानंतर या बिगीन वर क्लिक करावे. या ठिकाणी पुढील तिन्ही टप्प्यांवर अलावू, व्हाइल युझिंग द ॲप आणि अलावू वर क्लिक करावे. आता १४ प्रश्नाची उत्तरे दिल्यानंतर तुमच्या चाचणीचे मुल्यांकन केले जाईल व त्याच आधारे तुमच्या नैराश्याचे किंवा चिंतेचे स्तर/प्रकार सांगितले जाईल. आपल्या चाचणीच्या निकालाच्या आधारे समुपदेशन तथा मनोचिकित्सा मिळवून घेण्याकरिता तुम्हाला ईमेल द्वारे साईन अप करावे लागेल. या ठिकाणी आपण मोफत समुपदेशन तथा PsyBot च्या माध्यमातून मनोचिकित्सा करवून घेवू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला ज्याबाबत समुपदेशन किंवा मनोचिकित्सा घ्याची इच्छा आहे त्यानुसार दिलेल्या
पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करा, जर फोनव्दारे समुपदेशन घ्यायचे असेल तर दिलेल्या “हेल्पलाईन” वर क्लिक करा. आपला कॉल त्वरीत समुपदेशकाशी जोडला जाईल. समुपदेशन आणि मनोचिकित्सा ही एक प्रक्रिया असल्यामुळे ही प्रक्रिया आवश्यक असल्याप्रमाणे काही आठवडे, महिने या प्रमाणे सुरु राहील.
याप्रमाणे आपण घरी बसल्या-बसल्या आपली मानसिक स्थिती जाणून घेवू शकतो. तसेच आवश्यक असल्यास समुपदेश तथा मनोचिकित्सा सुध्दा मिळवून घेवू शकता.
सदरील कार्यक्रमाबाबत डॉ. विनोद जाधव, मानसोपचारतज्ञ (९०४९६२२१०६) व डॉ.सरफराज अहमद सौदागर (९४२३६२१९७६) हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
कार्यालयातील कर्मचा-यामध्ये कामाचा ताण कमी करण्याकरीता सुप्रसिध्द संमोहन तज्ञ
व प्रेरक वक्ता नवनाथ गायकवाड यांचे व्याख्यानाचे आयोजन दिनांक २ मे रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आले होते. सदर
कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, तहसिल
कार्यालय, यवतमाळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परीसरामध्ये असलेले इतर कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी तथा कर्मचारी यांनी आय विल केअर च्या माध्यमातून आपले मानसिक स्थिती तपासावी व आवश्यक असल्यास उपलब्ध असणारी समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.