मनसेचे राजु उंबरकर पोलिसांकडून स्थानबद्ध…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या ईशाऱ्यावरून व त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे त्यांची अटक होवु शकते यामुळे मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सरकारच्या वतीने प्रतिबंधात्मक पावले उचलल्या जात असुन मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड चालु झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर विदर्भात आक्रमक म्हणुन ओळख असलेले मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर यांना पोलिसांनी राहत्या घरीच स्थानबद्ध केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. जर ४ मे पर्यंत हे भोंगे उतरले नाही तर या मशिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचा आदेश ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. यामुळे राज्यात सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या..
तर विदर्भातील मनसेचा एकमेव आक्रमक चेहरा असेलेले व राजआदेश शिरसावंद्य मानणारे मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर यांना पोलिसांनी त्यांच्या वणी(जि.यवतमाळ)येथील राहत्या घरी स्थानबद्ध केले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौज फाटा उंबरकर यांच्या निवासस्थानावर तैनात करण्यात आला.
जिल्हाभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा
मनसेच्या पक्षीय आंदोलनात आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते अग्रेसर राहुन अनेक आंदोलने यशस्वी केली त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश दिले असल्याने जिल्हा पोलिस सुरक्षिततेच्या दिशेने पावले उचलुन मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत