नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणुकीतील पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरविण्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 26 नोव्हेंबर आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर, यांनी रात्री दिलेल्या माहितीनुसार नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषदेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस पर्यंत आलेल्या पाचही अर्जाला छाननीअंती पात्र अर्थात् वैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे (भारतीय जनता पार्टी ), प्रफुल्ल विनोदरावजी गुडधे ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) रवींद्र प्रभाकर भोयर ( इंडियन नॅशनल काँग्रेस ), मंगेश सुधाकर देशमुख ( अपक्ष), सुरेश दौलत रेवतकर ( अपक्ष ) यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.
आज उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नामनिर्देशनपत्रावर अन्य उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर व त्यांचे प्रतिनिधी सुरज लोळगे यांनी घेतलेले आक्षेप फेटाळण्यात आले असून बावनकुळे यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिली.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र परत घेण्याची तारीख 26 नोव्हेंबर आहे. 10 डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान होणार असून 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.