वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुले व म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डचे नियोजन ; जिल्हाधिका-यांनी केली ऑक्सीजन प्लाँट आणि सारी वॉडची पाहणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :- जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता लहान मुलांच्या उपचारासाठी तसेच सद्यस्थितीत वेगाने वाढणा-या म्युकरमायकोसीस या आजाराच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेगळ्या वॉर्डचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी करून दोन्ही वॉर्डचे त्वरीत नियोजन करावे, अशा सुचना दिल्या.
म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक 17 मध्ये 15 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर लहान मुलांसाठीचा वॉर्ड हा 36 बेडचा राहणार आहे. एक महिन्याच्या आत लहान मुलांचा वॉर्ड तयार झाला पाहिजे. तसेच औषधी व इतर साधनसामुग्रीसाठी त्वरीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. यावेळी त्यांनी सारीचे वॉर्ड क्रमांक 18, 19, 24, 25 ची पाहणी केली. तसेच वॉर्ड क्रमांक 15 मध्ये निर्माणाधीन नवीन पाईप लाईनची पाहणी करून अशीच पाईपलाईन वॉर्ड क्रमांक 16 मध्ये सुध्दा त्वरीत करावी करण्याचे निर्देश दिले.
पीसीए ऑक्सीजन प्लाँटची पाहणी करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, लवकरात लवकर दोन्ही प्लाँट कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम त्वरीत करा. तसेच येथे जनरेटर लावण्यात यावे. प्लाँट असलेल्या भागात पूर्ण इमारतीसाठी जनरेटर लावण्याचे नियोजन करता येईल का, याबाबतही विचारणा केली. लिक्विड ऑक्सीजन टँक त्वरीत फाऊंडेशनवर उभा करून पाईपचे कनेक्शन लवकर करा. 20 मे पर्यंत लिक्विड ऑक्सीजन प्लाँट कार्यान्वित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. गिरीश जतकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भुयार यांच्यासह ऑक्सीजन कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.
म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे : कोव्हीडमुळे म्युकरमायकोसीस या आजाराचे प्रमाण वाढले असून प्रतिकारशक्ती कमी असणा-यांणा रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधूमेह, एचआयव्ही आदी रोगांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोव्हीड पश्चात हा रोग होऊ शकतो. म्युकरमायकोसीस हा एक प्रकारे फंगस असून नाकातून तो इतरत्र अतिशय जलद गतीने पसरतो. या रोगाची प्राथमिक लक्षणे नाकाच्या आजूबाजूला सूज येणे, ही सूज डोळयापर्यंत राहू शकते, नाकातून सतत पाणी वाहणे, नाकातील आतील भाग काळसर येणे अशी आहे. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करावा.
यावर उपचार करतांना जेवढा भाग खराब झाला आहे, तेवढा भाग काढणे आवश्यक असते. तसेच रुग्णांवर चांगली देखरेख ठेवून ॲन्टी फंगल औषध देणे उपयुक्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात या रोगाचे रुग्ण आढळले नसले तरी सुध्दा भविष्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नाक, कान, घसा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र गवार्ले यांनी सांगितले.
०००००००

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….