सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सातारा :- “रात्री उशिरा झालेल्या ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा महेंद्र गायकवाड ऊर्फ बाहुबली ‘हिंद केसरी’ ठरला. त्याने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात केली.
पृथ्वीराजला दुखापत झाल्याने त्याने माघार घेतल्यावर महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले. महेंद्रला महाराष्ट्र केसरीने तब्बल तीनदा हुलकावणी दिली होती. मात्र, यंदाच्या (२०२४-२५) हिंद केसरीच्या गदेवर त्याने नाव कोरले. मोहोळचे महाराष्ट्र केसरीसह हिंद केसरी होण्याचे स्वप्न भंगले.
महेंद्र हा महाराष्ट्राचा दहावा, तर देशाचा ३९ वा हिंद केसरी ठरला. यापूर्वी श्रीपती खंचनाळे (१९५९), गणपतराव आंधळकर (१९६०), मारुती माने (१९६४), हजरत पटेल (१९६६), दीनानाथ सिंह (१९७१), चंबा मुतनाळ (१९७५), विनोद चौगुले (२००३), योगेश दोडके (२००५), अभिजित कटके (२०२३) यांनी ही कामगिरी केली होती. त्यात महेंद्रची भर पडली.
काजल धोचक (हरियाना) व खुशी दलाल (दिल्ली) यांच्यात महिला हिंद केसरी किताबासाठी लढत झाली. त्यात काजलने खुशीला चीतपट करून बाजी मारली. डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीने कांस्य पदक (तृतीय क्रमांक) पटकावले. तिने हरियानाच्या मीनूवर विजय मिळवला.
येथे राज्य भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान व तालीम संघाच्या वतीने साहेबराव पवार शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत वरील महेंद्र व काजलने ही सुवर्ण कामगिरी केली. महेंद्र दिल्लीच्या अनिरुद्ध कुमारला हरवून किताबी लढतीसाठी धडकला होता, तर पृथ्वीराजने एनसीआरच्या (उत्तर-मध्य विभाग) रजतवर मात करीत अंतिम सामन्यात झेप घेतली. त्यापूर्वीच्या सामन्यात त्याला पराभवास सामोरे जावे लागले होते.
पृथ्वीराजला संपूर्ण स्पर्धेत त्याचे वडील प्रशिक्षक होते. तेही उपमहाराष्ट्र केसरी आहेत, तर महेंद्रच्याही घरात पैलवानकीचा वारसा आहे. हे कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसीचे आहे, तर मोहोळ कुटुंबीय मुळशी तालुक्यातील मुठाचे आहे. यापूर्वी चार महाराष्ट्र केसरींनी हिंद केसरीची गदा पटकावली होती.
पृथ्वीराज-महेंद्र अशी लढत
पहिल्या दहा सेकंदातच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेत डाव करण्याचा प्रयत्न केला. त्यात पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. त्यामुळे कुस्ती थांबवण्यात आली. यात महेंद्रला दोन गुण मिळाले. काही वेळाने कुस्ती सुरू झाली. मात्र, पृथ्वीराजने दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. त्यामुळे महेंद्र हिंद केसरी ठरला.
पहिली उपांत्य फेरी
पहिली क्रॉस सेमिफायनल महेंद्र गायकवाड व दिल्लीच्या अनिरुद्ध कुमार यांच्यात झाली. अनिरुद्ध हा महाबली सतपाल यांचा पट्टा आहे, तर महेंद्र आंतरराष्ट्रीय कोच काका पवार यांचा शिष्य आहे. तो ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरीही आहे. सुरुवातीला महेंद्रने आक्रमक होत दुहेरी पट काढून दोन गुण घेत आघाडी घेतली. त्यानंतर अनिरुद्ध वारंवार आक्रमण करू लागला. मात्र, महेंद्र तो धुडकावत होता. एका बेसावध क्षणी अनिरुद्ध दुहेरी पटावर दोन गुण घेतल्याने गुणांची बरोबरी झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना आजमावू लागले. मध्यंतरापर्यंत अशीच स्थिती राहिली.
महेंद्रने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत अनिरुद्धवर ताबा मिळवला. त्यात दोन गुण मिळाले. याचवेळी अनिरुद्धला नकारात्मक कुस्तीमुळे गुण घेण्याचा पंचांचा इशारा मिळाला. ती संधी त्याने दोन गुण घेत साधल्याने गुणफलक चार-चार असा झाला. कुस्ती शेवटच्या मिनिटावर गेली तरी गुण बरोबरी होती. त्यावेळी चपळाईने महेंद्रने दुहेरी पटावर खाली खेचत मैदानाबाहेर फेकले. त्यात महेंद्रला चार गुण देण्यात आले. मात्र, याला अनिरुद्धच्या कोचने चॅलेंज दिले; परंतु ते अयशस्वी झाल्याने पुन्हा महेंद्रला पुन्हा एक गुण बहाल करण्यात आला. तो नऊ गुणांवर पोहोचला. शेवटच्या काही सेकंदात अनिरुद्धने आक्रमक होत तीन गुण मिळवले. मात्र, तोपर्यंत वेळ हातून निसटली होती. या कुस्तीत महेंद्रने दिमाखात (९-७) अंतिम फेरी गाठली.
दुसरी उपांत्य फेरी
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ व एनसीआरच्या रजत यांच्यात झाली. पहिल्याच मिनिटात पृथ्वीराजने दोन गुण घेतले अन् लगेच भारंदाज डाव टाकत दोन असे चार गुण मिळवले. मात्र, लगेच रजतनेही दोन गुण मिळवले. त्याने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. मात्र, त्यात गुण घेता आले नाही. मध्यंतराला चार-दोन असा गुणफलक स्थिर राहिला. मध्यंतरानंतर पृथ्वीराजने एकेरी पट काढून एक गुण मिळाला. रजत मैदानाबाहेर गेल्याने पुन्हा एक गुण मिळाला. पृथ्वीराज सहा गुणांवर होता. यादरम्यान रजतच्या पायाला दुखापत झाली. पृथ्वीराजने आक्रमक होत चितपट करून फायनल गाठली.
विजयला अश्रू अनावर; पृथ्वीराजसाठी गहिवरला
या स्पर्धेत शनिवारी मध्यरात्री ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याला पराभवानंतर अश्रू अनावर झाले. तो गेल्या सतरा वर्षांपासून मैदानात लढत आहे. याच कुस्तीच्या जोरावर त्याने पोलिस दलात एसीपी पद मिळवले आहे. मात्र, ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने विजयवर एकतर्फी जय मिळवला. या कुस्तीनंतर महेंद्रने त्याचे आशीर्वाद घेतले. मात्र, मैदानाबाहेर पडताना विजयला अश्रू अनावर झाले. तो या स्पर्धेत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. कुस्ती शौकिनांनीही हळहळ व्यक्त केली. रविवारी सकाळी दिल्लीच्या अनिरुद्ध व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात काटा कुस्ती झाली. दोघांचेही एकेक गुण होते. गुण समान झाले, तर शेवटी जो मल्ल गुण घेतो, त्याला विजयी घोषित केले जाते. परिणामी, पृथ्वीराज पराभूत झाला. तो हरल्यानंतर त्याच्या चाहत्यांना गहिवरून आले.

घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..