सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील भविष्य काय..? पक्षाकडून अखेर खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला काहीसा विराम मिळण्याची चिन्हे आहेत. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे अजूनही पदाधिकारी असून त्यांना पदच्युत केलेले नसल्याचे शनिवारी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाला सुधारित पत्र देणार असून त्यानंतर हे गैरसमज निकालात निघतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. पक्षाविषयी उलटसुलट चर्चांना विराम मिळावा, यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे स्पष्टीकरण देत असल्याचे पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर, पुन्हा २९ एप्रिल रोजी नवे पत्र पाठवत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकार्यांची यादी देण्यात आली. यातही पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यावरून, या दोघांनाही पदावरून हटवले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. सुनेत्रा पवार यांनी तातडीने स्पष्टीकरण देत, ही कारकुनी चूक असल्याचे सांगितले होते. तरीही पटेल आणि तटकरे यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह होते. याबाबत आता पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने, अजित पवार यांच्या निधनानंतर तात्काळ काही कागदपत्रे देण्याच्या वकिलांच्या सूचना होत्या. त्यामुळे ही तात्पुरती यादी करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकारी समिती ही सर्वोच्च आहे. याच समितीला पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याची आणि त्यातील नियुक्त्यांचे अधिकार आहेत, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
‘निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या कार्यकारी समिती आणि पदाधिकारी समिती या दोन पत्रांमध्ये पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या पदाचा उल्लेख राज्यसभा गटनेते असा असला, तरी ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राहतील. सुनील तटकरे यांच्याही पदाचा उल्लेख नसला, तरी ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहतील,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांवर गंभीर आरोप
‘अजित पवार यांचा सर्वांत जास्त छळ करण्याचा प्रयत्न हा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांची राजधानी असलेल्या बारामतीवर रोहित पवार यांचा डोळा आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी रोहित पवार हे ढोल बडवत आहेत. ते अजित पवार यांचा वारसा खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अजितदादांच्या पक्षाची चिंता रोहित पवार यांनी करू नये. तुमच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदार आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत. पण आम्ही आतापर्यंत आम्ही हा निर्णय घेतला नाही आहे,’ असे उमेश पाटील यावेळी म्हणाले….

निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती ; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार….!
महावितरणचे दोन तुकडे…! महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी स्थापन झाली स्वतंत्र वीज कंपनी….
पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस ; ‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा…
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….
मनोज जरांगेंकडून आंदोलनाची घोषणा, सदावर्ते भडकले, थेट एकनाथ शिंदेंना इशारा, तुम्ही आता….
मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या राज्यात निवडणुका..? कुणाला मिळणार संधी..?
सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील भविष्य काय..? पक्षाकडून अखेर खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप….