राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हातात घेतल्यानंतर संघटनेच्या मुख्य प्रवाहातून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या दोन बड्या नेत्यांना साईडलाईन करण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल (Praful Patel) यांना डच्चू देऊन पक्षाच्या सगळ्या आर्थिक नाड्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपल्या हातात घेतल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा पवार या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर नाराजी असल्याची कुजबुजही राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतली. प्रमोद हिंदुराव हे सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे उभयतांची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली असावी, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. वरिष्ठ पातळीवर सुरू असलेली नाराजी पाहता या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील नाराजीनाट्य संपून सर्वकाही पुन्हा आलबेल होणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
तत्पूर्वी बुधवारी संध्याकाळी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. अजित पवारा यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र, तेच सुनील तटकरे अचानक शरद पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कौतुक केले होते. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही क्षमता असणारे नेते आहेत, त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हे त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाकडे अधिकार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. या पत्रकार परिषदेनंतर आज लगेच प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
दुसऱ्या पक्षावर भाष्य करायचे काही कारण नाही. त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार आहे. त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यामध्ये जनमाणसामध्ये सगळ्यात प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आहे. तटकरे पटेल क्षमता असणारे नेते आहेत. परंतु त्यांच्याबद्दल सध्याच्या नेतृत्वाचे असेसमेंट वेगळे असेल. आम्ही एकत्र असताना प्रफुल पटेल केंद्रात मंत्री होते, 2003 पासून ते संसदेत आहेत, तटकरे हे रायगड जिल्ह्यातले नेते होते, राज्यातले नेते होते, अर्थमंत्री होते. त्यांचे काय कर्तृत्व आहे, हे मला माहिती आहे. परंतु ते ज्या संघटनेत आहेत, त्या संघटनेत कुणाचा किती आणि कसा वापर करून घ्यायचा, हा निर्णय त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांचा आहे. सध्याच्या नेतृत्वाचे पटेल-तटकरेंबाबत काही वेगळे असेसमेंट असेल, त्यामुळेच त्यांनी तसा निर्णय घेतला असावा, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?