छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; मनोज जरांगे म्हणतात, “२४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करा, अन्यथा.”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- “चिखला काकड (ता. लोणार) गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यास अमानुष मारहाण आणि गैरवर्तन करण्यात आल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले.
चिखला काकड गावात ३ फेब्रुवारीला स्थापित शिवरायांच्या पुतळ्याला एका गटाने विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. २० फेब्रुवारीला रात्री हा वाद विकोपाला गेला. यावेळी सरपंचांनी महिला व पुरुष यांना एकत्र करून शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना अमानुष मारहाण केली. त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला व इतर महिला आणि लहान मुलांनादेखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जरांगे पाटील यांनी आज, २१ फेब्रुवारीला चिखला काकड गाव गाठत पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि घटनेचा आढावा घेतला. ज्यानी आमच्या आया-बहिणींवर हात टाकला, त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत त्यांनी शासन आणि पोलीस प्रशासनाला ठणकावले. तसेच २४ फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर २५ तारखेला रणसंग्राम छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा स्थापित झाला आहे, तो तिथून हलवण्याला जरागे यांनी तीव्र विरोध दर्शवला. पोलीस उपस्थित असताना मुलींचे कपडे फाटेपर्यंत मारहाण होते, हे लज्जास्पद आहे. दोषींना अटक करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा लढा आता केवळ पुतळ्याचा नाही, तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आहे, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
विविध नेत्यांची भेट
पुतळा बसवला त्या ठिकाणी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली. आमदार गायकवाड यांनी संजीवनी वाघ यांना एक लाखाची मदत दिली. मी जर तिथे असतो तर त्या सरपंचाचे हातपाय तोडले असते, असे ते म्हणाले. आमदार कायंदे यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली.
३७ जणांविरुद्ध गुन्हे, २१ आरोपींना अटक
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी येथे भेट दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
ठिकठिकाणी बंद
चिखला येथील घटनेवरून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. देऊळगाव राजा, मलकापूर पांग्रा, बिबी दुसरबीड, यांसह ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…