काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण आदिवासी पट्ट्यात शोककळा पसरली असून, न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणारे एक प्रभावी नेतृत्व हरपले आहेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सुरुपसिंग नाईक यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकारण आणि राजकारणासाठी समर्पित केले. नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी ते कायम आक्रमक आणि संवेदनशील राहिले. शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून दाखवत त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. नवापूरसह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक पिढ्यांचे भविष्य घडण्यास मदत झाली.
सुरुपसिंग नाईक यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून झाली. पुढे १९७८ पासून त्यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आमदार म्हणून तब्बल आठ वेळा विजय मिळवला. १९७२, १९८५, १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २०१९ या काळात ते आमदार म्हणून निवडून आले. तसेच १९७७ आणि १९८० मध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणूनही निवडून गेले.
राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी समाजकल्याण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, वन आणि बंदरे यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी विकासाला प्राधान्य देत अनेक योजना मार्गी लावल्या. दुर्गम भागातील रस्ते, शिक्षण, पाणी आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
१९८१ ते २०१९ या दीर्घ कालावधीत ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. काँग्रेस पक्षात एक निष्ठावंत आणि विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती.
सुरुपसिंग नाईक यांच्या निधनाने नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील राजकारणासह समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आदिवासी समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात असून, त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….
महादेव जानकरांच्या पक्षाची काँग्रेससोबत आघाडी….