15 मजली इमारत, पार्किंगसाठी 5 मजले.. 90 कोटींच्या भूखंडावर भाजपचे मुंबईत आलिशान कार्यालय! अमित शहांच्या हस्ते भूमीपूजन, राजकारण तापले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भारतीय जनता पक्षाने (भाजप) अलीकडेच दिल्लीत आपले नवीन कार्यालय सुरू केले आहे. आता पक्ष मुंबईतही आपले नवे कार्यालय उभारत आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
चर्चगेट परिसरात हे भव्य कार्यालय दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमीपूजन –
सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथे महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली. शहा यांनी भूमिपूजन करून या कामाचा शुभारंभ केला. सुमारे दोन वर्षांत हे कार्यालय पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या आलिशान कार्यालयामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
असे असेल भाजपचे नवे कार्यालय –
महाराष्ट्र भाजपचे हे नवे कार्यालय चर्चगेट परिसरात १,६५५ चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर उभे राहील. ५५ हजार चौरस फूट जागेवर १५ मजली इमारतीचे बांधकाम केले जाईल.
पार्किंग: इमारतीच्या खालील पाच मजले पार्किंगसाठी असतील.
सोयीसुविधा: भाजपचे केंद्रीय नेते यापुढे हॉटेल किंवा सरकारी गेस्ट हाऊसमध्ये न थांबता, याच कार्यालयातील गेस्ट रूममध्ये मुक्काम करू शकतील.
केबिन: यामध्ये पक्ष अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन असतील.
मुख्यमंत्री कार्यालय: राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठीही याच कार्यालयात स्वतंत्र कक्ष असेल.
सभागृह: सुमारे चारशे कार्यकर्त्यांना बसण्याची क्षमता असलेले मोठे सभागृह असेल.
तंत्रज्ञान: अत्याधुनिक मीडिया सेंटर आणि कॉन्फरन्स रूमचीही सुविधा असेल.
भाजपने एकानाथ रियल्टर्स नावाच्या खासगी व्यक्तीकडून हा भूखंड सुमारे ९० कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
संजय राऊतांचे आरोप, फडणवीसांचे प्रत्युत्तर –
या नव्या कार्यालयाच्या बांधकामाची देखरेख भाजपचे माजी खासदार मनोज कोटक करत आहेत. कार्यालयाच्या भूखंड खरेदीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.
संजय राऊत (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) यांनी भूखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “राफेलच्या गतीने फाईल फिरली आणि भाजपला जमीन मिळाली.”
विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजप काचेच्या घरात राहत नाही.., “ज्या दिवशी आम्ही भूमीपूजन करणार, त्याच दिवशी काही विरोधी नेते यावर प्रश्नचिन्ह उभे करतील, हे मला आधीच माहीत होते. म्हणूनच पक्षाच्या कार्यालयासाठी हा भूखंड संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आणि बीएमसीच्या सर्व नियमांचे पालन करून खरेदी केला आहे, हे आम्ही आधीच निश्चित केले होते.”
‘कार्यालय कार्यकर्त्यांसाठी मंदिर’- अमित शहा
मुंबईतील चर्चगेट येथे झालेल्या भूमीपूजन समारंभात गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्य मंत्री आणि नेते उपस्थित होते. शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे मंदिरापेक्षा कमी नसते.” त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्रामध्ये भाजप आता कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही.” ते म्हणाले, “आता देशामध्ये परिवारवादाचे राजकारण चालणार नाही. ज्या पक्षात अंतर्गत लोकशाही व्यवस्था नाही, तो पक्ष देशाच्या लोकशाहीला कसे मजबूत करेल?”
शहांना ‘ट्रिपल इंजिन’ सरकार हवे –
आपल्या भाषणात अमित शहा यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मोठे लक्ष्य दिले. शहा म्हणाले की, “महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही यावर समाधानी असाल, पण मी डबल इंजिनवर समाधानी नाही, मला तर (केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही) ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली की, “स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक इतक्या ताकदीने लढा की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे.”
त्यांनी केंद्र सरकारच्या ‘कलम ३७० हटवणे’, ‘सीएए लागू करणे’, आणि ‘काही राज्यांत समान नागरी कायद्याची सुरुवात’ यांसारख्या उपलब्धी सांगितल्या. २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्याचे लक्ष्य आपल्यासमोर असल्याचे शहा यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….