‘महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे’; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत ‘अपमानास्पद’ असल्याची जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
राज्य सरकारकडे तिजोरी रिकामी असल्याचे कारण सांगितले जात असताना, मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यासाठी पैसा कुठून येतो, असा थेट आणि सणसणीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी सायंकाळी परळी शहरातील पंचवटी नगर येथील श्रद्धा मंगल कार्यालयात आयोजित एल्गार महासभेत ते बोलत होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, परळी शहराध्यक्ष गौतम आगळे, तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, प्रसन्नजीत रोडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सुजात आंबेडकर यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारच्या मदतीची तुलना पंजाब सरकारशी केली. “पंजाब सरकारने ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्यात गेली, त्यांना हेक्टरी ८० हजार रुपयांची मदत केली आहे. तर महाराष्ट्र शासनाने केवळ ८,५०० रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. मंत्री शेतकऱ्यांना भेटायला आले का? नाही. याचा अर्थ महाराष्ट्र शासन झोपलेले आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
बॅनरचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना, सरकारने अपमानास्पद मदत जाहीर केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मागणी केली की, सरकारने तातडीने सावकारांनी आणि फायनान्सवाल्यांनी शेतकरी-कष्टकऱ्यांची वसुली थांबवावी आणि पूर्ण कर्ज माफ करावे. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अमलात आणून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने १५ हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि पंचनाम्यानंतर पुन्हा वेगळी वाढीव मदत द्यावी.
पाटबंधारे विभागावर गंभीर आरोप
अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमागे सरकारच्या धोरणांचा दोष असल्याचे सांगत सुजात आंबेडकर म्हणाले, “शासनाने ठिकठिकाणी छोटे छोटे धरणे बांधली असती तर आज पूरपरिस्थिती उद्भवली नसती. पण मोठे धरण बांधून पाटबंधारे विभागाला जास्त पैसा कमवायचा होता, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.