“पुसदमध्ये आदिवासींचा एक लाखांचा उलगुलान मोर्चा” ; “संविधान बचाव – आरक्षण बचाव; आदिवासींचा जयघोष” ; “गैरआदिवासींच्या घुसखोरीविरोधात आदिवासी समाजाचा जाहीर इशारा” ; “आरक्षण आमच्या हक्काचे; हिरावून घेऊ देणार नाही” ; “बंजारा समाजासह इतर समाजाच्या गैरसंवैधानिक मागणीला आदिवासींचा विरोध” ; “लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत; मोर्चात उत्स्फूर्त सहभाग” ; “पारंपरिक लोकनृत्य आणि झेंडा-फलकांनी पुसद शहर हादरले” ; “महामानवांच्या वेशभूषेतून आरक्षण रक्षणाचा संदेश” ; “एक आदिवासी = एक लाख आदिवासी : घोषणाबाजीने पुसद दणाणले” ; “शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक मोर्चातून आदिवासी समाजाची एकजूट अधोरेखित”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “आदिवासी आरक्षणावर घाला घालण्याच्या प्रयत्नांविरोधात आणि बंजारा समाजासह काही इतर समाज अनुसूचित जमातींमध्ये घुसखोरी करून आरक्षण मिळवण्याच्या गैरसंवैधानिक मागण्यांचा निषेध करण्यासाठी पुसदमध्ये काढण्यात आलेल्या उलगुलान मोर्चात तब्बल एक लाख आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.
निवेदन देते वेळेत काढण्यात आलेलं छायाचित्र
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि महिला-तरुणाईपर्यंत प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने या मोर्चामध्ये सहभाग घेतला. पंचक्रोशीतील गावोगावातून हजारो वाहनांचे ताफे पुसद शहरात दाखल झाले. सर्वांच्या हातात निळे-पिवळे झेंडे, “संविधान बचाव – आरक्षण बचाव”, “आरक्षण आमच्या हक्काचे”, “महामानवांचा विजय असो” अशा घोषणांचे फलक झळकत होते.
मोर्चामध्ये पारंपरिक लोकनृत्ये दंडार, ससे, वाघरूळ, मासोळ्या यांच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. काहींनी बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सहभाग नोंदवून संविधानाने दिलेले आरक्षण कोणत्याही परिस्थितीत हिरावले जाणार नाही हा ठाम संदेश दिला.
मोर्चाची सुरुवात जुनी जिनिंग प्रेसिजपासून झाली. महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकून यशवंत रंगमंदिरात भव्य सभेत रूपांतरित झाला. संपूर्ण मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
सभेत आयोजकांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री इंद्रनील नाईक यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला. “प्रथम त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतरच बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करावी” अशी मागणी सर्व वक्त्यांनी एकमुखाने केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आढाव आणि सुरेश धनवे यांनी केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी केलेल्या योगदानामुळे मोर्चा यशस्वी झाल्याची भूमिका प्रास्ताविकातून अनिल बुरकुले व राम अंभोरे यांनी मांडली. त्यानंतर मान्यवरांचे भाषण झाले.
सभेच्या शेवटी आमदार भीमराव केराम यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचे आभार माधवराव वैद्य यांनी मानले. राष्ट्रगीताने या भव्य आणि ऐतिहासिक मोर्चाचा समारोप झाला.