दहावी, बारावी परिक्षांच्या तारखा जाहीर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “सीबीएसई बोर्डाच्या २०२६ च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने आगामी बोर्ड परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार, परीक्षा १७ फेब्रुवारी ते १५ जुलै २०२६ दरम्यान होणार आहेत.
यावर्षी सुमारे ४५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील, जी संख्या गेल्या वर्षीपेक्षा तीन लाखांनी जास्त आहे. यावर्षी सीबीएससीने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
परीक्षेत नापास झाल्यास काळजी नाही! ‘या’ दोन मोठ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा तणाव मिटणार
१. दोन-परीक्षा प्रणाली
यावर्षीपासून सीबीएससीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे – तो म्हणजे ‘दोन-परीक्षा प्रणाली’. याचा अर्थ, जर कोणताही विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेत एखाद्या विषयात अनुपस्थित राहिला किंवा नापास झाला, तर त्याला पुन्हा संपूर्ण वर्ष वाया घालवावे लागणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरी परीक्षा घेतली जाईल. १०वीची दुसरी परीक्षा १५ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत होईल. एवढेच नाही, ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारायचे आहेत, ते सुद्धा या दुसऱ्या सत्रात पुन्हा परीक्षा देऊ शकतील.
२. कठोर उपस्थितीचे नियम
परीक्षेत बसण्यासाठी काही नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ७५% उपस्थिती अनिवार्य आहे. सर्व विषयांचे अंतर्गत मूल्यांकन देणे बंधनकारक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने हे मूल्यांकन चुकवले, तर त्याचा निकाल घोषित केला जाणार नाही.
इयत्ता ९ आणि ११ वीची अट
आता इयत्ता ९वी आणि १०वी यांना एक ‘फुल प्रोग्राम’ मानले जाईल, त्याचप्रमाणे ११वी आणि १२वीलाही. याचा अर्थ, १०वीची बोर्ड परीक्षा देण्यासाठी ९वी आणि १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, आणि १२वीची परीक्षा देण्यासाठी ११वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
खेळाडूंसाठी मोठी सूट आणि लवकर निकाल
खेळांमध्ये सक्रिय असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही बोर्डाने खास सोय केली आहे. जर कोणताही खेळाडू आपल्या क्रीडा स्पर्धेमुळे पहिल्या बोर्ड परीक्षेत गैरहजर राहिला, तर त्याला दुसऱ्या सत्रामध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल. तसेच, यावर्षी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन परीक्षेच्या १० ते १२ दिवसांत पूर्ण केले जाईल, ज्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होईल.
निकाल कुठे मिळणार?
प्रवेशपत्र प्रवेशपत्र परीक्षेच्या दोन आठवडे आधी जारी केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या बोर्ड परीक्षेचा निकाल डिजीलॉकरवर (DigiLocker) अपलोड केला जाईल, ज्याचा वापर विद्यार्थी ११वीच्या प्रवेशासाठी करू शकतील.
विज्ञान शाखेच्या परीक्षा कधी?
१२वीच्या विज्ञान शाखेतील मुख्य विषयांच्या (PCM) परीक्षा १२ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ पर्यंत होतील, प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेनंतर साधारणपणे १० दिवसांनी प्रॅक्टिकल किंवा इंटर्नल असेसमेंट सुरू होतील, जे १२ दिवसांच्या आत पूर्ण करावे लागतील.
अंतिम वेळापत्रकासाठी प्रतीक्षा
सध्या जाहीर झालेले वेळापत्रक तात्पुरते आहे. सीबीएसई विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्राप्त केल्यानंतर अंतिम वेळापत्रक जाहीर करेल. विद्यार्थी अधिकृत आणि अचूक माहितीसाठी cbse.gov.in या वेबसाइटला नियमितपणे भेट देऊ शकतात.