विदर्भात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान..! अजून किती दिवस जोर राहणार कायम..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “परतीच्या पावसाने शनिवारी विदर्भातील जोरदार तडाखा दिला. अकाेला व वाशिम जिल्ह्यांत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. यादरम्यान अकोला शहरातील नाल्यात एक वाहून गेल्याची घटना घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील ११ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने विविध मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसाने थैमान घातले. यात हजारो हेक्टवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
नागपुरात मुसळधार
येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नागपूर शहरात सायंकाळी ५.३० नंतर पावसाचा जोर वाढला व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागपूर ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३.८ मि.मी. पाऊस तर सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत ३ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण १६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत १००४.८ मिमी पाऊस
नागपूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत १००४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही सरासरीपेक्षा तब्बल ८ टक्के अधिक आहे. सरासरी याच काळात ९३०.३ मिमी पावसाची नोंद होते. तर विदर्भात १०४५.२ मिमी पाऊस झाला असून, हा सरासरीपेक्षा १२ टक्के जास्त आहे. सरासरी ९२९.४ मिमी पाऊस होतो
पावसाचा जोर कायम
चंद्रपूरसह जिल्ह्यात शनिवारी दुपारी १२:३० वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसा जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. गेल्या २४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक ५७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यानंतर मूल येथे ४६.५ मिलिमीटर आणि पोंभूर्णा येथे ४२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांमध्ये तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे.
वादळी पाऊस, लाेंबीच्या धानाला फटका
गडचिराेली जिल्ह्यात शनिवारी वेगवेगळ्या भागात पाऊस झाला. आरमाेरी तालुक्याच्या काही भागात दुपारनंतर जाेरदार पाऊस पडला. यामुळे लहान नाले व ओढ्यांना पूर आला. जिल्ह्यात शुक्रवार ते शनिवार सकाळी ८ वाजेपर्यंत ५ मंडळांत अतिवृष्टी झाली. काेरची १०९.२ मिमी, एटापल्ली १०६.२, बाह्मणी ७०.४ मिमी, कढाेली ६८.८, सिराेंचा ६७.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
२० हजार हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी (दि. २७) सकाळी बरसलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर देवरी तालुक्यात ६७.४ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. धरण क्षेत्रातसुद्धा पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे ८ दरवाजे ०.९ मीटरने तर शिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे ०.६ मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या ९६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोसेखुर्दचे १५ गेट उघडले, वैनगंगा फुगली
भंडारा जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे १५ गेट अर्धा मीटरने सकाळपासून उघडण्यात आले आहेत. तर, कारधाजवळ नदीची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ३१.३ मिमी सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली. मात्र, पवनी तालुक्यातील आमगाव परिसरात शनिवारी दुपारी १११ मिमी पाऊस पडला असून येथे अतिवृष्टी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २२१.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची रिपरिप
वर्धा जिल्ह्याला शुक्रवारी रात्री पावसाने झोडपून काढले. शनिवारीसुद्धा शहरासह काही भागात पावसाने हजेरी लावली. हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, आदी तालुक्यांत पाऊस बरसला. यशोदा नदीला पूर आल्याने अलमडोह ते अल्लीपूर या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सेलू तालुक्यातील बोर मोठा प्रकल्पाचे तीन दरवाजे शनिवारी दुपारी १२ वाजता प्रत्येकी १० सेंटिमीटरने उघडण्यात आले.
खरीप हंगामातील कापूस, साेयाबीन, तूर आदी पिके जाेमात असतानाच पावसाने कहर केला. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच्या पिकांचे पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना पुन्हा पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
अकाेला, वाशिम जिल्ह्यांत मुसळधार
अकाेला व वाशिम जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले. अकाेला शहरात शनिवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ५९ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. बार्शिटकाळी, पातूर तालुक्यांत सोयाबीन, कपाशी पीक जमीनदोस्त झाले. तांदळी, नांदखेड, भंडारज परिसरात कापणीला आलेले सोयाबीन पीक जमीनदोस्त झाले. महान, सारकिन्ही परिसरात मुसळधार पावसाने शेकडो हेक्टरवरील तूर, कपाशी, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर अधिक वाढला. जून ते २० सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे आधीच २.१० लाख शेतकऱ्यांच्या ४.३७ लाख एकरांवरील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद व कापूस पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे उरलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
११ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा
यवतमाळ जिल्ह्यात दाेन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. गत २४ तासांत ३३. ३ मिमी पावसाची नाेंद घेण्यात आली आहे. यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, नेर, पुसद आणि राळेगाव तालुक्यातील ११ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. काही भागांत पूर परिस्थितीमुळे विविध मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसाने माेठे नुकसान झाले. काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या, तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मदत कार्य केले जात आहे.
विद्यार्थी, शिक्षक अडकले
कळंब (यवतमाळ) तालुक्यात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. गंगापूर पुलावरून पाणी वाहत असल्याने गंगापूर, वंडली, तुळजापूर, परसोडी (दिघडे) व मंगरूळ या गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपळगाव येथे शिकायला येणारे विद्यार्थी पुराच्या पाण्यामुळे गावातच थांबले आहेत. परसोडी शाळेतील शिक्षकही पुरामुळे अडकले आहेत. त्यामुळे ते शाळेतच थांबून विद्यार्थ्यांचा अतिरिक्त वर्ग घेत आहे.
अमरावती जिल्ह्यात दुपारी जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यादरम्यान शहरात दुपारी ३ च्या सुमारास अर्धा तासपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने नवरात्र सुरू झालेल्या अनेक कार्यक्रमात तारांबळ उडाली. दरम्यान, २४ तासांत सरासरी १२.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.