‘दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा’, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- “सांगलीत झालेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेला तोंड फोडले आहे.
नेहमीच आपल्या भाषणांमुळे चर्चेत राहणारे भिडे यावेळी थेट भारतीय संविधानावर उद्विग्न टीका करताना दिसले.
भिडे म्हणाले, ‘जगात 187 देश आहेत, आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात! विद्वान लोक पोटात मुरड आल्यासारखे संविधान, संविधान म्हणतात. कसलं संविधान बोलता?’ त्यांनी पुढे भारताबाबत तीव्र शब्दांत टीका करताना म्हटलं की, ‘1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला हा देश आहे. ज्यांना गुलामीची लाज नाही, तो निर्लज्ज लोकांचा देश आहे.’
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ दिला. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेले नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली. आम्हालाही फक्त स्वराज्य नको आहे, तर हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे.’
या भाषणात भिडे यांनी नवरात्रीत होणाऱ्या दांडिया खेळावरही टीका केली. ‘गणपती व नवरात्र उत्सवात दांडिया खेळून वाटोळं झालं आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे,’ असे वक्तव्य करून त्यांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडवली.
संभाजी भिडे यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. संविधान आणि दांडिया यावर केलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय व सामाजिक स्तरावर टीका-टिप्पणी होण्याची शक्यता आहे.