विदर्भात पुन्हा पाऊस जोरात बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका…! अखेर केव्हा घेणार माघार…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “राज्यभरात शेतकऱ्यांना रडवत असलेल्या पावसाने विदर्भातही धुमशान घातले आहे. उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला लागलेला मान्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे. बुधवारपासून सर्व जिल्हे पावसाच्या सावटाखाली आले आहेत.
गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा जिल्ह्यात जाेरदार जलधारा बरसल्या, तर नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात रिमझिम सरींची हजेरी लागली.
बंगालच्या उपसागरात सध्या सायक्लाेनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्या प्रभावाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. ही सक्रियता विदर्भातही वाढली आहे. बुधवारी दिवसभर बहुतेक जिल्ह्यात आकाश ढगांनी व्यापले हाेते व सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. गडचिराेलीत गुरुवारी सकाळपर्यंत ६७.८ मि.मी. व सायंकाळपर्यंत २६ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरला सकाळी ३२ व सायंकाळी ३४ मि.मी. ची नाेंद झाली. गाेंदियातही तीव्रतेने जलधारा बरसल्या व ३५ मि.मी. नाेंद झाली, तर भंडारा शहरात २२ मि.मी. पाऊस झाला. नागपूरला गुरुवारी सकाळपासून ढगांची सक्रियता वाढली. सकाळी ३.९ मि.मी. नाेंद झाली. दिवसभरही थांबून थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या व सायंकाळी ११ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला.
सप्टेंबरचा शेवट पावसाळी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची ही सक्रियता २९ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. या काळात विदर्भात मुसळधार ते मध्यम सरींचा पाऊस ठिकठिकाणी हाेत राहिल. सध्या अकाेला व अमरावती वगळता विदर्भाच्या इतर जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली आहे. पूर्ण महिना पावसाच्या सावटात जाणार आहे. विदर्भातून ५ ते १० ऑक्टाेबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.