मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे चार बळी, 76 जनावरं दगावली; १८ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके पाण्याखाली….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठवाड्यात सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत ७५ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला असून, चार जणांचा मृत्यू झाला आणि ७६ जनावरे दगावली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे मुंबईतून या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्यांना फटका
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यांना बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ गावांचा संपर्क तुटला. धाराशिव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या २०० जणांची एनडीआरएफ आणि लष्कराने सुटका केली. चिंचोगील (ता. भूम) येथे ७० वर्षीय महिलेचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. वीज पडून नांदेड जिल्ह्यात एका, तर लातूर जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. एक जण वाहून गेला. मराठवाड्यात १८ लाखांवर हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत.
शेतकरी वाहून गेला
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा मंडलात आठ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली. वरखेडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने स तीश मोहन चौधरी (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण, वडनेर आदी ठिकाणी सुमारे १५० जण पुरात अडकले होते. त्यांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. रूई येथील १३ जणांना नौकेद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, तर देवगाव येथील २८ जणांना हेलिकॉप्टरने सुखरूप सुरक्षितस्थळी आणण्यात आले. एनडीआरएफ, लष्कराचे पथक बचाव कार्य करत आहे. जिल्ह्यात आज, मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात दोन बळी
लातूर जिल्ह्यात सांगवी (ता. निलंगा) येथील अनिता मारुती राठोड (वय ३८) यांचा वीज पडून मृत्यू झाला. बावलगाव येथील एक जण जखमी झाले. काटेजवळगा (ता. निलंगा) येथे दयानंद संभाजी बोयणे (वय ४२) पाण्यात वाहून गेले. जिल्ह्यातील २० रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठड्यातील अहवालानुसार मराठवाड्यात १२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.