शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी ते शेतमालाचे दर, बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेती प्रश्नावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे दर शेतकरी आत्महत्या या मुद्यावरुन त्यांनी सरकारवर हल्लाबलो केला.
कर्ज घेणं हे कांही चुकीचं नाही. कर्ज घेतल्यानंतर ते कशावर खर्च केले जातो हे महत्वाचं आहे. राज्य सरकार आता सांगत आहे की आता आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र निवडणुकी अगोदर तुम्ही लाडक्या बहिणींना तीन हफ्ते एकत्र पैसे दिले. जशी निवडणूक झाली तशी अर्ध्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या. पैशाअभावी लाडका भाऊ प्रशिक्षनार्थी योजना ही बंद करुन टाकली. कारण हा फक्त निवडणूकीपुरता कार्यक्रम होता अशी टीका कडू यांनी केली. हा मदत म्हणून कार्यक्रम नसून त्यांचा राजकीय वापर करुन घेण्यासाठी होता असे कडू म्हणाले.
निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालावा
मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हेच माहिती नाही. कारण प्रशासन ठेवून सगळा माल जमा करायचा आहे. ना नगरसेवक, ना जिल्हा परिषद सदस्य सगळा नियंत्रण एकाच ठिकाणाहून करायचे आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालावा. ईव्हीएम देखील भाजपाच्या कार्यालयात ठेवा लोक येतील बटन तुम्ही दाबा अशी टीका कडू यांनी केली. जयकुमार गोरे यांना भाजपाचं डोकं आहे. त्यांना लोकांची डोकी थोडीच आहेत. आमचं डोकं हे सामान्य लोकांचे डोकं आहे. आमदारांचे पगार जर दहा वर्षात 70000 वरुन तीन लाखापर्यंत जात असेल आणि दिव्यांग बांधवांचा निधीसाठी लढावं लागत असेल, सोयाबीन 3400 रुपयांना विकावं लागत असेल, कापसावर शुल्क लागणार असेल, तर मग करणार काय? असे कडू म्हणाले.
15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी सुरुकरा, अन्यथा सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार
आता आम्हाला सांगता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. देशातील 200 उद्योगपत्यांचे तुम्ही 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केलं आहे. शेतकऱ्यांचे 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होते असे कडू म्हणाले. आमचं सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस द्यायला पाहिजे, त्यासोबतच GST चा परतावा देणार असंही सांगितलं होते, मात्र कांहीच होते नाही असे कडू म्हणाले. अतिवृष्टी झाली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन 3 हजार 400 रुपयांनी विकायला निघणार आहे त्यावर सरकार बोलायला तयार नाही असे कडू म्हणाले. 15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली नाहीतर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार असल्याचा इशारा हाकेंनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरात कॅम्पेनवरही टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरात कॅम्पेनवरही देखील बच्चू कडू यांनी टीका केली. हे व्यवस्थित राजकारण आहे, जाहिरातीवरचा खर्च वेगळा, मात्र शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचेच आहेत असं ही दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे सगळे महापुरुष हे जातीजातीत वाटून टाकण्याचा त्यामागचा उद्देश आहे. मराठ्यांचं आंदोलन संपल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पायावर फुल टाकताना देवा भाऊ दाखवले, हे या पाठीमागचं षडयंत्र आहे. हे सगळं आरएसएस माईंड सांगत आहे असे कडू म्हणाले. आमच्या जाती जातीत आणि महापुरुषात भांडण लावण्याचे काम हे सरकार करत आहे असे कडू म्हणाले.
मी फक्त शेतकऱ्यांसाठी बोलणार, त्यांच्या आयुष्य वाहून घेणार
प्रत्येक जातींना आपापल्या आरक्षणासाठी लढावं, मात्र कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी आपसात भांडू नये, गावातले वाद वाढवू नये असे कडू म्हणाले. मी कुठल्याच जातीबद्दल बोलणार नाही हे कालच शपथ घेऊन सांगितलं आहे. मी फक्त शेतकऱ्यांसाठी बोलणार आणि शेतकरी हा सगळ्यात जातीत धर्मात आहे आणि यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार असल्याचे कडू म्हणाले.
अख्खा गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आहे, शेतकरी संकटात आहे, यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी एकतरी दौरा केलेला दाखवा. त्यामुळे ते पुन्हा ऑनलाईन झाले. हीच लोक उद्धव साहेबांना नाव ठेवायचे आता हेच साहेब ऑनलाईन झाले आहेत अशी टीका कडू यांनी केली. गोवंश हत्या बंदीच्या बाबतीत गुंडा कार्यकर्त्यांचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे. माझं म्हणणं आहे की गोमातेला कापू नये, बिलकुल माझं त्याबद्दल एकमत आहे. गाय गोरक्षणामध्ये ठेवली तर पैसे भेटते आणि गाईला शेतकऱ्यांपाशी ठेवलं तर काहीच भेटत नाही. हा कसला न्याय आहे असे कडू म्हणाले. गोरक्षकाला अनुदान देतात तर मग शेतकऱ्याला का अनुदान देत नाहीत, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याला अनुदान द्या असे कडू म्हणाले. तुम्हाला तुमच्या संस्थेच्या माणसांची आणि कार्यकर्त्यांची पोट भरायची आहे.
गोवंश एकत्रित ठेवले तर अनुदान आणि वेगवेगळे ठेवले तर अनुदान नाही वारे कायदे असे कडू म्हणाले. त्यामुळं धर्माचं नाव सांगून हे शेतकऱ्यांना मारणारच आहेत असेही कडू म्हणाले.
सात महिन्याच्या काळात सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
बटेंगे तो कटेंग असं योगीजी म्हणाले होते, मात्र आता कोण करत आहे हे तुम्हीच सांगा. या सात महिन्याच्या काळात सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे कडू म्हणाले. त्यामध्ये आत्महत्या करणारे 90 टक्के शेतकरी हे हिंदू आहेत, अशावेळी कुठे जातो तुमचं हिंदुत्व फक्त निवडणुकीच्या काळापुरताच तुमचा हिंदुत्व असतं का? असा सवाल कडू यांनी केला. प्रभू रामचंद्राचे मंदिर बांधायचे आणि प्रभू रामचंद्राचा आदर्श मात्र वाऱ्यावर सोडायचं हेच आहे का तुमचं हिंदुत्व? असा टोला देखील त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं चांगलं डोकं देशात आणि जगात कुणाचंच नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलं तर एका मिनिटात ओबीसी मराठा वाद संपेल. तुम्ही म्हणाला होतात पुन्हा येईल मनावर घेतलं आणि पुन्हा आलात. त्यामुळे मराठा आणि ओबीसी वाद का संपत नाही असे कडू म्हणाले. त्यांच्यासारखं चांगलं डोकं देशात आणि जगात कुणाचंच नाही. कायद्यात, समाजशास्त्रात, राजकारणात ते हुशार आहेत. असा तज्ञ माणूस महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आहे. मग त्यांच्या काळात असे वाद होतातच कसे? असा सवाल कडू यांनी केला
गावाकडचे रस्ते खराब आणि महामार्ग चांगले
जर जबरदस्ती करुन कोणी शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करत असेल तर आम्ही देखील जबरदस्ती करु असा इशारा कडू यांनी दिला. माझ्या आजोबा पणजोबांनी हा रस्ता पाहिला मात्र त्या रस्त्यात साधा ढेकूळ सुद्धा पडला नाही. पण तुम्हाला पानंदरस्ते महत्त्वाचे वाटत नाहीत अजूनही त्या ठिकाणी शेतातला माल बाहेर येऊ शकत नाही. अक्कलकोटमध्ये रुग्णवाहिका जात नाही म्हणून बैलगाडीतून रुग्णांना न्यावे लागत आहे. अशी गावाकडची अवस्था आहे, गावाकडचे रस्ते खराब आणि महामार्ग चांगले. वाह रे सरकार असे कडू म्हणाले.