भारत-पाकिस्तान समान्यावरून ओवैसी भाजपावर संतापले; म्हणाले, ‘देशभक्तीवर बोलणाऱ्यांनो.’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “आशिया कप स्पर्धेत आज (रविवार) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असून या सामन्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाद पेटला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भार पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान होत असलेल्या क्रिकेट सामन्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधी पक्षा आणि दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांनी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. यादरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ओवैसी यांची भाजपावर कडाडून टीका
ओवैसी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळत आहेत. जर तुमच्या मुलीचा मृत्यू झाला असता तर खेळला असतात का? हातावरील मेंहदी निघाली नाही अशा तुमच्या मुलीचा मृत्यू झाला असता तर क्रिकेट सामना खेळला असता का?’ असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला.
ओवेसी पुढे बोलताना म्हणाले की, ‘उद्या क्रिकेटचा सामना होईल, किती पैसे येतील? ६००-७०० कोटी… आता हे भाजपाच्या लोकांना सांगायचे आहे की, देशभक्तीवर बोलणाऱ्यांनो ओंजळभर पाण्यात बुडून मरा… आम्ही भारताच्या पंतप्रधानांना विचारू इच्छितो की, तुम्ही म्हणालात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही. एका क्रिकेट सामन्याने बीसीसीआयला किती पैसे मिळतील? २००० कोटी? ३००० कोटी? आपल्या २६ भारतीय नागरिकांच्या प्राणांची मूल्य अधिक आहे की पैसे जास्त आहेत ते सांगा… हे भाजपाला सांगावेच लागेल… देशभक्तीवर मोठ-मोठी भाषणं देतात, ज्ञान देतात… क्रिकेट मॅचचा प्रश्न आला तर रन आऊट झालात…’
देशभरात भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध होत आहे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पाकिस्तान बरोबर होत असलेल्या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले जात आहे.
किती वाजता पाहता येईल सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती असणार आहे. तर पाकिस्तानची धुरा सलमान अली आगाच्या हाती असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला सुपर ४ मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.