“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उद्धव आणि राज ठाकरे फोटोमध्ये केव्हाच एका फ्रेममध्ये आलेले असताना आता राजकीयदृष्ट्या कसे एकत्र यायचे याची फ्रेम बुधवारी तब्बल अडीच तास झालेल्या चर्चेत ठरली.
दसरा मेळाव्यात दोघांनी शिवाजी पार्कवर एकत्र यायचे का यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. यातच आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुती, महाविकास आघाडीचे नेते याबाबत प्रतिक्रिया देत आहेत.
उद्धव सेनेचा दसरा मेळावा २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांनी उपस्थित राहावे की नाही या बाबत चर्चा झाली. दोन बंधूंनी एकत्र येण्यासाठीचे आणखी एक मोठे पाऊल या भेटीच्या निमित्ताने उचलले गेले. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे महापालिकांसह अन्यत्र दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसे एकत्र यायचे याबाबत चर्चा झाली. जागा वाटप हा विषय नव्हता, मात्र, कशा पद्धतीने एकत्र येता येईल. दोघांच्या पक्षांचे हित सांभाळून युती कशी करता येईल, हा चर्चेचा मुख्य गाभा होता, असे म्हटले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी यावर भाष्य केले.
मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले
उद्धव ठाकरे यांना मदतीची गरज आहे. म्हणूनच ते मनसेकडे गेले. यापूर्वी मनसेने विनाशर्त पाठिंबा दिला होता. परंतु, तोही त्यांनी स्वीकारलेला नव्हता. आज त्यांना गरज आहे, म्हणून ते मातोश्री सोडून बाहेर पडले आहेत. ते भेटतात, चांगली गोष्ट आहे. याबद्दल आम्ही कधी कुणी वाईट बोललेलो नाही. परंतु, हा बदल जनतेने समजून घेतला पाहिजे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान, ठाकरे बंधू इतके दिवस का लावत आहेत, हाच प्रश्न आहे. ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यांचा विचार एक आहे. परीस असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श त्यांना झालेला आहे. एकत्र यायला कुणाचा आक्षेप नाही, आमच्या शुभकामना आहेत. पितृपक्षात त्यांच्या एकत्र येण्यावर चर्चा सुरू झालेल्या आहेत. नवरात्रात त्यांनी कायमस्वरुपी एकत्र यावे. एका मंचावर यावे. एकाच मंचावर येऊन चांगल्या कामांसाठी जनतेचा आवाज बनावा, यासाठी आमची सदिच्छा आहे. आता प्रश्न राहिला की, निवडणुका जिंकायच्या की नाही. निवडणुका जिंकायच्या असतील, तर भूमिका बदलावी लागेल. लोकहितासाठी काम करावे लागेल. फक्त पंतप्रधान मोदी यांचा विरोध करून मोठे होता येत नाही. एखाद्या मेरिट मिळालेल्या विद्यार्थ्याची निंदा करून ३५ टक्के किंवा त्याखाली मिळालेला विद्यार्थी मेरिटमध्ये येत नाही. त्याला अभ्यास करावा लागेल, असे सांगत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला.