“देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ज्या पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होते, त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट मॅच खेळतोय. ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात आपले शिष्टमंडळ मोदींनी पाठवले होते. मात्र आता देशभक्तीची थट्टा नाही तर देशभक्तीचा व्यापार चालवला आहे.
सीमेवर जवान शहीद होणार, भारतीय नागरिकांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, मग देशापेक्षा, हिंदुत्वापेक्षा भाजपाला व्यापार मोठा वाटतो का? . भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून आपण दहशतवादाविरोधात आहोत हे दाखवून देण्याची संधी पंतप्रधानांना आहे. आपण कुठलेही संबंध पाकिस्तानसोबत ठेवणार नाही हे जाहीर करावे अशी मागणी करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध करत आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. आता पाकिस्तानसोबत मॅच खेळली जाते. आम्ही याचा निषेध म्हणून राज्यभर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घराघरातून सिंदूर जमा करून पंतप्रधान कार्यालयाला पाठवले जातील. हर घर से सिंदूर अभियान आम्ही राबवतोय. अजूनही वेळ गेली नाही. ही मॅच होणार नाही हे मोदींनी दमदारपणे सांगायला हवे. पहलगाम हल्ल्यात महिलांचे सौभाग्य उजाडले त्यानंतर देशभक्तीच्या नावाखाली भाजपा दांडियाचं आयोजन करत आहे. भारत-पाकिस्तान मॅचला फारसा प्रतिसाद मिळत नाही. जय शाह उद्या मॅच पाहायला गेले, त्यांना देशद्रोही ठरवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच आपल्या देशाला कणखर पंतप्रधान लाभेल म्हणून आम्ही पाठिंबा दिला होता. मात्र कणा हिन सरकार असल्याने पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात हे पंतप्रधान आणू शकतील यावर मला आता विश्वास नाही. जावेद मियादाँद मातोश्रीवर आला होता, त्याला ठणकावून भारत-पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र यांचे नेते न सांगता नवाज शरीफांच्या वाढदिवशी केक खायला गेले होते. त्यामुळे भाजपाने आम्हाला देशभक्ती शिकवू नये. सगळीकडे व्यापार सुरू ठेवला आहे. क्रिकेट सामन्यातून मिळणारे पैसे देशापेक्षा मोठे आहे का असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारले.
दरम्यान, भाजपाने देशभक्तीचा व्यापार सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्याला ३-४ महिने झाले असतील. त्यात आपले भारतीय नागरिक ज्यारितीने मारले गेले. बहिणीचं कुंकू पुसले गेले. आजही ही जखम भरली नाही. पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद पसरवतो, हल्ले करतो. त्याविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. आपल्या भारतीय सैन्याने कठोर उत्तर पाकला दिले. आपले सैन्य पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेईल असं वाटत होते. परंतु आपल्या सैन्याला थांबवण्यात आले. हे युद्ध कुणी थांबवले? युद्ध थांबवणारे कोण आहेत? खून और पानी साथ मै नही बह सकता, मग क्रिकेट आणि खून एकत्र कसे होऊ शकतात. यांना फक्त क्रिकेट मॅचमधून पैसा कमवायचा आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.