जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर जोरदा निशाणा साधलाय. थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जरांगे सातत्यानं टीका करतात. याशिवाय जरांगे पाटील यांनी आज मंत्री नितेश राणे यांच्यावरही टीका केली.
या टीकेला नितेश राणेंचे बंधू आमदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. जरांगेंनी वैयक्तिक टीका करू नये असा सल्ला निलेश राणे यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांना चिचुंद्री म्हणत टीका केली होती. नितेश राणेंनी मनोज जरांगे यांनीच हिंदूंमध्ये फूट पाडली असा आरोप केला होता. तर जरांगेंच्या आंदोलनाला रोहित पवार रसद पुरवतायत असाही आरोक राणेंकडून करण्यात आला होता.
नितेश राणेंच्या टीकेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की, चिंचुंद्रीचे कधी पाय मोजता आलेत का? तिच्या पायाचा मिळ लागत नाही. चिचुंद्री सर्व ऋतुत लाल असते. काय म्हणते तेही कळत नाही. एकदा आंदोलन संपू दे. मग नितेश राणेंना बघतोच असंही जरांगे पाटील म्हणाले होते.
जरांगेंच्या टीकेवर नितेश राणेंचे बंधू आमदार निलेश राणे म्हणाले की, नितेश एखाद्या विषयावर बोलल्यानंतर तुम्ही त्यावर टीका करा, पण वैयक्तिक टीका करू नका. तो काही टोकाचं बोलला नाहीय. कोणत्याही धमकीला राणे कुटुंब घाबरत नाही. तुम्ही मरायला तयार असता तसेच राणेही असतात. आमच्या कुटुंबावर कुणी हात टाकायची भाषा करत असेल तर आम्ही सहन करणार नाही.
भाषा जपून वापरायला पाहिजे. आम्ही तुम्ही काही परके नाहीय. विषय सोडवताना नातं तुटता कामा नये याचीही काळजी घ्यायला हवी. जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध आपुलकीचे राहिलेत. कौटुंबिक राहिलेत आणि ते तसेच रहायला हवेत. तुमच्याकडूनही सबंध चांगले रहावेत अशी अपेक्षा आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलीय.