मराठा मोर्चादरम्यान दुर्दैवी घटना, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मनोज जरांगे यांच्या मोर्चादरम्यान सहकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू.
जुन्नरमध्ये घडलेल्या या घटनेने मोर्चात खळबळ उडाली.
मोर्चा निघण्यापूर्वी लातूरमध्ये तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे यांनी दोन्ही घटनांवर दु:ख व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. अंतरवाली सराटीवरून निघालेला जरांगेचा मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला. या मोर्चादरम्यान हृदविकाराचा झटका येऊन जरांगेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याआधी जरांगेंचा मोर्चा निघण्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी लातूरमधील एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी ते जुन्नरमध्ये दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्यासंख्येने किल्ले शिवनेरी येथे गर्दी केली होती. या मराठा बांधवांमधील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश ज्ञानोबा देशमुख (वय ४० वर्षे) असं या मृत आंदोलकाचे नाव आहे. सतिश देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासोबत मुंबईला जाणार होते. पण मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वीच त्यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्टला मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला. हा मोर्चा काढण्यापूर्वी लातूरमधील एका मराठा तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावात ही घटना घडली होती. बळीराम मुळे (३५ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. सध्या या तरुणावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.