पुढील 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस; पाहा राज्यातील हवामान अंदाज….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मान्सून वाऱ्यांचा वेग तुलनेनं कमी झाला असला तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
ज्यामुळं बहुतांश भागांमध्ये सूर्यकिरणांना झाकोळणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळत असून, राज्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताशी 30 ते 40 किमी वेगाचत्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेच्या सोबतीनं 27 ते 31 ऑगस्टदरम्यान मराठवाज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी असेल. याशिवाय वाऱ्याच्या याच वेगासह पावसाच्या तुरळक सरींची हजेरी उत्तर मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर पावसाच्या ढगांची दाटी होणार असून, त्यामुळं पाऊस बरसणार आहेच. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानतासुद्धा कमी होणार असल्यानं प्रवासादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळत असून, उत्तर कोकणातील जिल्ह्यांनासुद्धा हा पाऊस झोडपताना दिसणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पारघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवस डोक्यावर येईल तसा पावसाचा जोर तुलनेनं कमी होताना दिसणार आहे.
राज्यात वाढलेल्या पावसामुळं कमाल आणि किमान तापमानाच बदल होताना दिसत आहेत. किनारपट्टी भागांमध्ये पावसानं विश्रांती घेताच आर्द्रतेचं प्रमाण वाढत असून, त्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या समस्यासुद्धा भेडसावत आहेत. सध्या मोसमी पाऊस हा अखेरच्या टप्प्यात प्रवेश करत असून येत्या काळात हे पर्जन्यमान कसं आणि किती प्रमाणात कमी होणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, गणेशोत्सवादरम्यान मिळणारी पावसाची साथ हीच वस्तूस्थिती आहे हे खरं.
राज्यात सध्या मान्सूनची स्थिती काय आहे?
मान्सून वाऱ्यांचा वेग कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे?
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
पावसाचा कालावधी आणि तीव्रता कशी असेल?
27 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ताशी 30-40 किमी वेगाच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पडतील.