पुणे जिल्ह्यातील ‘या’ पट्ठ्याने भरला उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज..! ‘या’ अर्जाने राजकीय वर्तुळात खळबळ….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधी आघाडी INDIA ब्लॉकने बी. सुदर्शन रेड्डी यांचं नाव जाहीर केलं आहे.
मात्र, या दोन दिग्गज उमेदवारांव्यतिरिक्त आता महाराष्ट्रातून एका तरुणानेही अर्ज दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा उमेश म्हेत्रे या तरुणाने थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतील राज्यसभा सचिवालयात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे त्याने आपला अर्ज सादर केला. यासाठी आवश्यक असलेले 15,000 रुपयांचे डिपॉझिट त्याने जमा केले आहे.
साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या उमेश म्हेत्रे यांनी दाखल केलेल्या या अर्जामुळे स्थानिक पातळीवर आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार किमान 35 वर्षांचा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर किमान 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. उमेश म्हेत्रे यांनी या सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे दोन राष्ट्रीय आघाड्यांच्या उमेदवारांसोबत एक सर्वसामान्य तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
उमेश म्हेत्रे यांचा हा अर्ज हा तरुणाईतील आत्मविश्वास आणि लोकशाहीवरील विश्वास याचं प्रतीक मानला जात आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य तरुणाने देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी अर्ज करणे ही गोष्ट लोकशाहीच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी आहे.
आता निवडणूक आयोग या अर्जाची छाननी करणार असून, तो वैध ठरल्यास उमेश म्हेत्रे प्रत्यक्ष मतदानाच्या शर्यतीत सहभागी होतील. ही निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडणार असून त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
सध्या उमेश म्हेत्रे यांचे नाव सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. मोठ्या आघाड्यांच्या उमेदवारांसोबत एका तरुणाची एंट्री उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला वेगळं वळण देणारी ठरते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.