आरक्षणाचं जुनं सूत्र विसरा ; झेडपी , स्थानिक स्वराज्य संस्था , पंचायत समिती साठी आता आरक्षणाचा नवा फॉर्म्युला…!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आमचा झेडपी गट किंवा पंचायत समिती गण यापूर्वी अमुक जातीसाठी आरक्षित होता. आता या जातीसाठी आरक्षित होईल, असा अंदाज बांधून निवडणुकीची तयारी करत असाल तर थांबा. यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील आरक्षणाचा आता संबंध असणार नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरता क्रम या निवडणुकीसाठी केला जाणार आहे, त्यामुळे मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून लढण्याची तयारी करत असाल फसगत होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यापूर्वी झालेल्या १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीसाठी १९९६ ची नियमावली वापरली जात होती. मात्र, आगामी काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने नवी नियमावली तयार केली आहे. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन नियमावली तयार झाल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम १९९६ हा रद्द करण्यात आला आहे.
ज्या गटात/गणात २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती आणि जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने या जागा वाटून दिल्या जाणार आहेत. नव्या उतरत्या क्रमाची ही पहिलीच निवडणूक (Election) असणार आहे. त्यामुळे जी लोकसंख्या अधिक, तेच गट/गण या निवडणुकीसाठी गटात/गणात अनुसूचित जाती/जमातीला राखीव हे निश्चित झाले आहे.
नव्याने येणारा हा उतरता क्रम २०२५ पासून नंतर होणाऱ्या सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी वापरला जाणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या राखीव जागा आणि यापूर्वी ओबीसीसाठी राखीव न झालेल्या गट/गणातून फिरत्या पद्धतीने ओबीसी आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी व या प्रवर्गातील महिलांसाठी किती जागा राखीव असाव्यात? याची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे.
आरक्षण प्रक्रियेसाठी नवी नियमावली जाहीर : देशमुख
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी गट व गणाची आरक्षण प्रक्रिया राबविण्यासाठी नवी नियमावली प्रसिद्ध झाली आहे. या नव्या नियमावलीनुसार गट व गणाच्या आरक्षणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. आरक्षण सोडतीबाबत अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत, या सूचना प्राप्त झाल्यानंतर नव्या नियमानुसार प्रक्रिया केली जाईल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
अंतिम मतदार यादी अन् आरक्षण सोडतीकडे लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि ११ पंचायत समित्यांच्या १३६ गणांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार २८२ एवढे मतदार आहेत. या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती स्वीकारणे, हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ही प्रक्रिया राबवीत असताना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची आरक्षण सोडतही काढली जाणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या या दोन्ही प्रक्रिया ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.