“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पालघर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तो गड झाला पाहिजे, यासाठी मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
रविवारी (दि.3) रोजी मनोरमधील कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा शिष्य असल्याचे सांगत ठाणे आणि पालघरची नाळ धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे जुळली आहे.आनंद दिघे यांनी पालघर पिंजून काढत शिवसेना रुजवली होती. त्यांचा शिष्य असल्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते सर्व केले जाईल असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकदिलाने काम करून विजय मिळवण्यासाठी जोर लावण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.हिंदुत्वासाठी बंड करून काँगेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आणि गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला,छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने राज्याचा कारभार सुरु असल्याचे प्रतिपादन केले.
अडचणीच्या काळात उभे राहण्यासाठी काहीही करायला तयार असतो त्यामुळे ईर्षाळवाडी तसेच पहेलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीसाठी धावलो,बंड करून महाविकास आघाडीत असलेले सरकार कोसळवले, शिवसेनेत बंड केले तेव्हा पाच ते सहा मंत्र्यांसह पन्नास आमदार सोबत आले होते,या बंडाची नोंद देश आणि जगाने घेतली.
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले,विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आशिर्वादामुळे 232 आमदार निवडून आले. पदाची कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदी कार्यरत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आणि संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडला. मनोरच्या सायलेंट रिसॉर्टमध्ये रविवारी दुपारी पार पडलेल्या मेळाव्याला पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला.
यावेळी उपनेते निलेश सांबरे,पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक,आमदार राजेंद्र गावित,विलास तरे, आदिवासी आघाडीचे जगदीश धोडी,जिल्हा प्रमुख कुंदन संखे,वसंत चव्हाण,महिला आघाडीच्या ज्योती मेहेर, वैदेही वाढाण आणि मोठया संखेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काही अपरिहार्य करणामुळे शिवसेनेचा उमेदवार देता आला नाही,परंतु विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर युती चे उमेदवार निवडून आले,आगामी स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जीवाचं रान करू असे सांगत निवडणुकी संदर्भात आपल्या आदेशाची वाट पहिली जात आहे.तसेच बाहेरून शिवसेना पक्षात आलेला कार्यकर्ता काम करत नसतील तर त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तालुका स्तरावर बैठाका घेऊन गावोगावी जाण्याची गरज आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, विजयाच्या मेळाव्यासाठी शिंदे साहेब येतील असा आशावाद निलेश सांबरे यांनी व्यक्त केला.