ठाण्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात शिंदेच्या युवा सेनेचे आंदोलन.., ‘भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान.. असे म्हणत दिला इशारा’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
भगवा दहशतवाद असे कुणीही म्हणू नये. त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा किंवा सनातनी दहशतवाद म्हणा. भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे, असे विधान चव्हाण यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ ठाण्यात युवा सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे, त्याचा अपमान अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा युवा सेनेने दिला.
मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये बाॅम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. यामध्ये विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली. यावर आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असतानाच, कॉँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भगवा दहशतवाद हे म्हणू नका तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असे विधान केले आहे. तसेच आरोपी निर्दोष सुटणे हे तपास यंत्रणेचं अपयश आहे, असेही चव्हाण म्हणाले. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले
माझी हात जोडून विनंती आहे, भगवा दहशतवाद हा शब्द वापरु नका. भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग आहे. तसेच तो वारकऱ्यांच्या झेंड्याचा रंगही भगवा आहे. त्यामुळे भगवा दहशतवाद असे कुणीही म्हणू नये. त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा किंवा सनातनी दहशतवाद म्हणा. भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनाही माझी विनंती आहे. भगवा दहशतवाद म्हणू नका. दहशतवादाला धर्म, रंग काहीही नसते. त्यामुळे त्याला कुठलाही रंग देऊ नका असे आवाहन मी करतो आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
युवा सेनेचे आंदोलन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात शनिवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी, पालघर जिल्हा निरिक्षक नील पांडे, पूजा लोंढे, श्रध्दा दुबे, अश्फाक चौधरी, विकेश भोईर, निखिल वाडेकर, ठाणे शहरातील युवासैनिक आणि युवतीसेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाणांना इशारा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म, हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधान करत असतील त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. राज्यभरात युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात अशी हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध व्यक्त करू. भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे. त्याला कोणी ठेच पोहचवत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पुर्वेश सरनाईक यांनी यावेळी दिला.