“पुढील २० वर्षे तुम्ही तिथेच बसणार”, अमित शाह विरोधकांवर संतापले; सभागृहात काय घडलं?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी मंत्री एस. जयशंकर हे लोकसभेत बोलते होते. भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोन झाला होता का?
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवेळी ट्रम्प यांनी खरंच मध्यस्थी केली होती का? या संदर्भातील स्पष्टीकरण मंत्री एस. जयशंकर लोकसभेत देत होते. मात्र, यावेळी विरोधकांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न करत सरकारला काही प्रश्न विचारले.
तसेच मंत्री एस. जयशंकर लोकसभेत बोलत असताना विरोधकांनी केलेल्या गोंधळावरून गृहमंत्री अमित शाह हे विरोधकांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. मंत्री एस. जयशंकर बोलत असताना विरोधकांच्या गदारोळामुळे मध्येच गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. भारताचे परराष्ट्र मंत्री सभागृहात बोलत आहेत. मात्र, विरोधकांना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांवर विश्वास नाही. पुढील २० वर्षे तुम्ही तिथेच (विरोधातच) बसणार, असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांनी सुनावलं.
अमित शाह काय म्हणाले?
“एवढ्या गंभीर विषयावर चर्चा होत असते, तेव्हा सरकारच्या एका महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यांचं भाषण सुरू असताना त्यांना थांबवणं तुम्हाला शोभत नाही. ते (विरोधी पक्ष) भारतीय परराष्ट्र मंत्र्यांवर विश्वास ठेवत नाहीत, तर दुसऱ्या देशातील व्यक्तीवर विश्वास ठेवतात. यावर माझा आक्षेप आहे. त्यामुळे विरोधकांच्या पक्षात परदेशी व्यक्तीचं महत्त्व किती आहे हे मी समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाने जे काही म्हटलं ते सर्व सभागृहात लादलं पाहिजे. त्यामुळेच ते तिथे (विरोधी बाकांवर) बसले आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच राहतील”, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलं.
शस्त्रसंधीवेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोन झाला का? एस. जयशंकर यांचा खुलासा
शस्त्रसंधीवेळी पंतप्रधान मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रप्म यांच्यात फोनवरून संवाद झाला होता की नाही? याचा खुलासा आता देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेत बोलताना केला आहे. २२ एप्रिल ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रप्म यांच्यात कोणताही संवाद झाला नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान बोलताना दिलं आहे.
“आपली विमानं किती पडली?”, राजनाथ सिंह काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, “आजही आपले विरोधक विचारतात पाकिस्तानने भारताची किती विमानं पाडली ते सांगा. मला वाटतं राष्ट्रीय जनभावनेचा हा अनादार आहे. कारण त्यांनी एकदाही आम्हाला हे विचारलं नाही की आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानची किती विमानं पाडली? मी विरोधकांना हे सांगू इच्छितो की त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी हे जरुर विचारावं की भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले का? तर त्याचं उत्तर आहे हो. मी विरोधी पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का? तर त्याचं उत्तर आहे होय, ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं”, असं राजनाथ सिंह म्हणाले.