फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “:शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची, नेत्यांची भाषणे झाली.
यावेळी, सभागृहात ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध टोलेबाजी केल्याचं दिसून आलं. तत्पूर्वी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट ऑफरच देऊ केली. त्यानंतर, सभागृहात चांगलाच हशा पिकला. मात्र, हे सभागृहातील खेळीमेळीचं वातावरण असल्याचं ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र, राजकीय वर्तुळात या ऑफरची चांगलीच चर्चा होत आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीत तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अँटी चेंबरमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामध्ये, विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती संदर्भात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची माहिती आहे. हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले. तसेच, हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मात्र, हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाहीये, त्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते.
दरम्यान, अंबादास दानवे यांची आमदारकी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येत आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढील अधिवेशनासाठी कोणीही विरोधी पक्षनेते राहणार नाही. त्यामुळे, अगोदरच उद्ध ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याची मागणी केली आहे.आता, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गांभीर्याने घेण्याची गरज नाही – राऊत
“आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही. मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहातच ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यांनी एखादा टोमणा, टपली, टिचकी मारली असेल ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.