जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सांगलीशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्या. एक म्हणजे जयंत पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळीच या पक्षातील एक ज्येष्ठ अन् दिग्गज नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपच्या मार्गावर जाण्यासाठीचा मुहूर्त निश्चित केला.
या मागचे नेमके गूढ काय, याची चर्चा सर्वत्र आहे.
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, या चर्चा रोज माध्यमांतून सुरू असतात. त्यामुळे जयंत पाटील यांच्याभोवतीचं संशयाचं भूत काही कमी होताना दिसत नाही. त्यातच या पक्षातील नेत्यांचे ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. त्यांच्याच मतदारसंघातील डांगे भाजपच्या वाटेवर निघाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरे तर डांगे हे मूळचे संघ परिवारातले नेते. २००३ मध्ये त्यांनी भाजपचा त्याग करून राजकीय संन्यास घेतला आणि पुढे संन्यास सोडून ते राष्ट्रवादीतसुद्धा मोठ्या डौलात दाखल झाले. खरंतर भाजपने डांगे यांना मंत्री करून मोठी संधी दिली. मात्र भाजपची सत्ता गेल्यानंतर डांगे यांनीही पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या वेळी भाजपमध्ये मुंडे-महाजन पर्व सुरू होते आणि पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने नाराजी व्यक्त करत डांगे यांनी भाजप सोडला होता. मात्र भाजपने त्यांना मोठे केले आणि अण्णांनीही पक्षासाठी तळागाळापर्यंत काम केले. आता अण्णासाहेब डांगे यांनी वयाच्या नव्वदीत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांना; म्हणजे भाजपच्या शीर्ष नेतृत्वासह अन्य पक्षांनाही अचंबित करणारा आहे. राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी अण्णासाहेब डांगे यांनी एका गाजलेल्या मराठी गीताचा उल्लेख करत ‘शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात…’ असे शरद पवार यांना सांगत प्रवेश केला होता. मात्र अण्णांना पुन्हा ‘घरट्या’साठी ‘अंगण’ बदलावं लागलं आहे, ही एक राजकीय अपरिहार्यता आहे.
भाजपने त्यांना येथे बळ देताना शैक्षणिक संस्था, सूतगिरणी या सर्व गोष्टींचं पाठबळ दिलं. मात्र त्यांचे नेतृत्वाशी बिनसले. अशावेळी एका टप्प्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून धक्का दिला होता. अर्थात, २०१४ मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतरही ते राष्ट्रवादीतच राहिले होते. मधला काही काळ सोडला तर आता राज्यात, केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत काही अर्थ राहिला नाही, म्हणून पुन्हा भाजप, असाच अर्थ यातून काढायचा का? जयंतरावांचे प्रदेशाध्यक्षपद जाणे आणि त्यानंतर त्याच दिवशी डांगे यांनी पक्ष सोडणे या दोन्ही गोष्टींचा योगायोग समजायचा की यातून काही आणखी अर्थ काढायचा, हा देखील संभ्रम यातून निर्माण झाला आहे. कारण जयंतरावांनी इस्लामपूरच्या राजकारणात चिमण डांगेंना उपनगराध्यक्ष, अध्यक्ष करून संधी दिली होती. जयंतरावांच्या राजकारणात गेली काही वर्षे डांगे त्यांच्यासमवेत राहिले आहेत. आपल्या पुढील पिढीचे हित कशात आहे, हे बापच चांगले ओळखत असतो आणि याच एका अर्थाने डांगे यांनी एकदा सोडलेल्या भाजपच्या ‘अंगणा’त पुन्हा आपले ‘घरटे’ नेले आहे.
स्थानिक भाजप याबाबत अनभिज्ञ आहे की काय, असे वाटते. परवाच जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. तो घडविण्यात ‘जनसुराज्य’चे नेते समित कदम यांनी पुढाकार घेतला. आता डांगे यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटीवेळीही समित कदम यांचाच पुढाकार दिसून आला. तत्पूर्वी राष्ट्रवादीचेच विट्याचे नेते वैभव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे महापौर म्हणून राहिलेले आमदार इद्रिस नायकवडी की, ज्यांचे वडील जनाब इलियास नायकवडी हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांचे घराणेही आता राष्ट्रवादी सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहे. अशा पद्धतीने दस्तूरखुद्द जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच त्या पक्षातूनच या जिल्ह्यामध्येच ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते.
जयंतराव आणि भाजप हे ‘कनेक्शन’ फार पूर्वीपासून आहे. त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर जाऊ लागले आहेत. एक काळ संपूर्ण महाराष्ट्रात सांगली हा राष्ट्रवादीचा सर्वांत मोठा गड होता. या जिल्ह्यातील काही दिग्गज हे सुरुवातीला राष्ट्रवादीत गेल्याने या पक्षाची राज्यातील ताकद वाढण्यास मदत झाली होती, हे वास्तव आहे. आता राष्ट्रवादी रिकामा होतानाही पक्षाला सांगलीतून मोठे भगदाड पडू लागले आहे. याचे शल्य अर्थातच सात वर्षे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या जयंतरावांना वाटणार. आता पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर हे ‘आऊटगोईग’ रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
अण्णासाहेब डांगे पालकमंत्री असताना त्यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका करण्याचा धाडसी निर्णय घेत येथील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का दिला होता. पालकमंत्रिपदाची कारकीर्द गाजली होती. अर्थात, पुढे ते पक्षातून गेल्यानंतर भाजपने महापालिकेत स्वबळावर सत्ताही आणली.