“..तर तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल”, CM फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला ठाकरेंची ऑफर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी होताना दिसत आहे.
तर बऱ्याचदा या नेत्यांच्या भेटीगाठीही होताना दिसतात. सोमवारी विधानभवनाच्या परिसरात खास दृश्य पाहण्यास मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची भेट झाली. दोघांत काही वेळ चर्चा झाली.
विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच ही घटना घडली. दरेकर यांनी एक अहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवला. एक विकास योजनेच्या संदर्भात हा अहवाल होता. चर्चा या अहवालानेच सुरू झाली होती नंतर मात्र दोघांत अन्य गप्पाही रंगल्या.
या चर्चेतच दरेकर यांनी मी शंभर टक्के शिवसैनिक असल्याचं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंना स्मितहास्य करत मग आता त्या नकली शिवसैनिकांनाही प्रामाणिक होण्यास सांगा असा टोला लगावला. जर तुम्ही खरंच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत आहात तर आपण सोबत काम करू शकतो. परंतु, यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल.
आमदार दरेकर आधी शिवसेनेत होते. नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पुढे त्यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. सध्या दरेकर भाजपाचे विधानपरिषद आमदार आहेत. ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य खरंतर शिंदे गटासाठी होतं. ठाकरे पुढे म्हणाले, जर तुमचे हेतू स्वच्छ असतील तर मी कधीही चर्चेसाठी तयार आहे. यावर दरेकरांनीही हसत बिलकुल, चला तर मग आपण सगळेच पुन्हा एकत्र येऊ, असे उत्तर दिले.
दोन्ही नेत्यांतील हा संवाद ऐकणाऱ्यांना हैराण करणारा आणि कोड्यात टाकणाराही होता. जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतरपासून ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झाली होती तेव्हापासून भाजप आणि ठाकरे गटात राजकीय वैर वाढत गेलं. परंतु, आता दरेकर आणि ठाकरे यांच्यातील संवाद दोन्ही पक्षांतील जुन्या नात्याला उजाळा देणारा ठरला.