अजितदादांनीच आता बीडचं ‘पर्यावरण’ सुधरावं, पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बीडमधील गुन्हेगारी कृत्याबाबत नवीन गोष्टी समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तर, दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणावर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. अशातच आता राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
मुंबईत पंकजा मुंडे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. संतोष देशमुख प्रकरणाबाबत त्यांनी म्हटले की, संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना घेऊन भाषण देण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणं महत्त्वाचं असल्याचे पंकजा यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार बीडची स्थिती सुधारू शकतात…
पंकजा मुंडे यांनी म्हटले की, बीड जिल्ह्याचे वातावरण बिघडलं आहे हे बोलतानाही मन जड होत आहे. राज्यभर घडणाऱ्या घटनांचा मी आढावा घेते. यावर आता अजित पवार, मुख्यमंत्री जिल्ह्याचे पर्यावरण सुधारू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीडचे राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल आणि माझीदेखील या कामात त्यांना साथ असेल असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे बीडच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे यांच्याऐवजी अजित पवार असणार असल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
बीडचे अधिकारी त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी आणले
बीडचे अधिकारी बहुतांश एकाच जातीचे आणि एकाच नेत्याच्या जवळचे असल्याचा आरोप या आधी करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही नावासहित त्याची आकडेवारी समोर आणली होती. त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी पाच वर्षे जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर होते. मग हे अधिकारी मी आणले का? बीडमधील हे अधिकारी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणले आहेत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते, पण आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनीही केली आहे.”
बीडच्या प्रकरणात धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्यावर त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरं देऊ शकतात. माझे काही प्रोटोकॉल आहेत, मी मंत्री आहे. मी यावर काही बोलणं योग्य नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….