मनोज जरांगे पाटील संतापून म्हणले, आम्हाला कापा आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन द्या…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसांपासून राज्य नव्हे तर देशभर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजत आहे. देशमुख यांच्यासह परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलने उभारली जात आहेत.
अशातच रविवारी (ता. ५) देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी पुण्यात मोर्चा निघाला आहे. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, संताप व्यक्त करताना, आम्हाला कापा आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन द्या.., असे म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध करावं
जरांगे पुढे म्हणाले, वाल्मिक कराड यांच्या विरोधात सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र लवकरच देशमुख यांच्या खुनाचा गुन्हाही दाखल केला जाईल, अशी अपेक्षा आहे. मंत्र्याच्या मदतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सरकारने या प्रकरणाची सर्व पाळमुळं खोदायला सुरुवात केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही मंत्र्याला पाठी घालत नाहीत, हे सिद्ध करावे लागणार आहे. या प्रकरणातील कोणत्याही आरोपी सुटला अथवा त्याच्यावर ३०२, मोका आणि त्यांची नार्कोटाईझ झाली नाही तर मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी फसवल्याचा संदेश जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
चोरट्यांना मुंडे सांभाळतात
तसेच जरांगे यांनी, देशमुख कुटुंबाला पूर्णपणे न्याय मिळत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे मोर्चे राज्यभर सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. सध्या तरी सरकार आरोपींना पाठीशी घालतयं असं चित्र दिसत नाही. मात्र मुख्य आरोपींबरोबर त्यांना मदत करणाऱ्यांना सह आरोपी न केल्यास समाज रस्त्यावर उतरेल.
पण इतरांप्रमाणेच आम्हालाही देखील या आरोपींच्या पुण्यातील कनेक्शनवरून प्रश्न पडला आहे. ते पुण्यातच का सापडतात? देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बीड मधील खिसे कापणारे चोरटे असून ते थेट पुण्यात कसे आले? अशा आरोपींना मुंडे यांनी सांभाळणं चुकीचं आहे. अशा आरोपींना साफ केलं पाहिजे असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मुंडे लपून बसले असून…
यावेळी जरांगे यांनी ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांना आपण विरोधक मानत नसल्याचे सांगत आतापर्यंत आपण कोणत्याही जातीला दुखावलेलं नसल्याचा दावा केला आहे. तर फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण आणि संतोष देशमुख यांना न्याय मागत असून जातिवाद कधीच करत नाही असे सांगितले आहे. धनंजय मुंडे हे लपून बसले असून हाके यांच्यासारख्या इतरांना फोन करून ते बोलायला सांगत असल्याचा आरोप देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.
तसेच जरांगे यांनी चितावणी खोर वक्तव्यावरून बोलताना, मी कोणतेही चितावणीखोर वक्तव्य केलेली नाहीत. आमची माणसं मारून टाका त्यांना कापा आणि आमची मुंडकी मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन द्या. असंच आता आम्ही सांगायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जरांगे पाटील यांनी, संतोष देशमुख यांच्या मुलीला मुख्यमंत्री जर न्याय देत नसतील, धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात असतील तर आम्ही शांत कसं बसायचं का? असा सवाल केला आहे. तर आता समाज शांत राहणार नसून इथून पुढे जशास तसे उत्तर देऊ असाही इशारा त्यांनी दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. पण आपण मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून याबाबत संवाद साधणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.