बारावीचा १५ जुलैपर्यंत, दहावीचा जुलैअखेर निकाल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोमवारी दिली. त्याचप्रमाणे जिओ टिव्ही आणि गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. ऑनलाइन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दहावी आणि बारावी निकालाच्या प्रक्रियेचा ठाकरे यांनी आढावा घेतला. ‘निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलैअखेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी या बैठकीत दिली.दहावीच्या परीक्षेला यंदा १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीला १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीची सर्व विषयांची परीक्षा टाळेबंदीपूर्वी संपली होती. मात्र, दहावीची भूगोलाची परीक्षा होऊ शकली नाही. सध्या टाळेबंदीतही ९७ टक्के उत्तरपत्रिका मूल्यांकन करून परीक्षकांनी जमा केल्या असून उर्वरित काम सुरू आहे, असे काळे यांनी सांगितले.
अकरावी प्रवेश प्रक्रियेची १ जुलैपासून सुरूवात
जुलैअखेरीस दहावीचा निकाल जाहीर होणार असून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी विभागाने सुरू केली आहे. १ जुलैपासून महाविद्यालयांची नोंदणी सुरू होणार आहे. यंदा संकेतस्थळात आवश्यक ते बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तकापासून शुल्क भरण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आहे. मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन असून बाकीच्या जिल्ह्य़ांमध्ये ऑफलाईनच असेल.
विद्यार्थ्यांना ‘जिओ टिव्ही’वर शिक्षण
विद्यार्थ्यांसाठी जिओ टिव्हीवर शिक्षण विभागाने दोन वाहिन्या सुरू केल्या असून, गुगल मीट प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन वर्ग भरवण्यात येणार आहेत. जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्त्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या असून पहिली ते बारावीसाठी स्वतंत्र ५ वाहिन्या सुरू करण्याचेही नियोजन आहे. त्याचप्रमाणे दूरदर्शन वाहिनीवर दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले. गुगल मीटवर भरणाऱ्या वर्गाचे प्रात्यक्षिक ठाकरे यांनी पाहिले.