……अन् कृषीमंत्री दादा भुसे शेतकऱ्याच्या पाया पडले..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शेतकऱ्यांमुळे आम्ही आहोत, तुम्ही आमच्या पाया पडु नका, आम्हीच तुमच्या पाया पडतो, तुमचे आर्शिवाद राहु द्या, असे म्हणत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी चक्क शेतकऱ्याचे पाय धरले. कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्याबद्दलचा हा आदर पाहून उपस्थित सगळेच भारावून गेले. कृषीमंत्री सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. खरीप हंगाम सुरू झाला आहे, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं मिळतात की नाही याचा आढावा घेण्यासाठी ते सध्या प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर दादा भुसे यांनी त्यानी विविध ठिकाणी भेटी दिल्या. आपल्या बोलण्या, वागण्यातून ते लोकांमध्ये मिसळून लोकांशी आपलेपणाने संवाद देखील साधत आहेत.त्याचा साधेपणा पाहून शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत. कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथील शेतकरी चांगदेव बांगर यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर ते येडशी येथील शेतात गेले होते.
पेरलेले बियाणे उगवतच नाही अशी तक्रार आल्यानंतर कृषीमंत्र्यांनी थेट जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार ओमप्रकाश राजेनिंबळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक घेतली.
या बैठकीतही त्यांनी अनेक गोष्टीवरुन अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन यामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले. सध्या असलेला पुरवठा व प्रत्यक्षात विक्री करताना शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणीचा याचा आढावा घेण्याची गरज असुन अधिकाऱ्यांनी या काळात कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करु नये, अशी सक्त ताकीदच त्यांनी संबंधितांना दिली.तत्पुर्वी त्यांनी येरमाळा येथील बांगरवाडीच्या एका शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पेरणी केली, पण काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने नुकसान झालेले आहे. याची पाहणी करण्यासाठीच हा दौरा असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आधीच ओळखून कृषीमंत्र्यांनी त्यांच्या शंकाचे निरसन करत दिलासा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा राग देखील काहीसा शांत झाल्याचे यावेळी पहायला मिळाले. ‘ शेतकऱ्यांनी काळजी करु नये, हे सरकार तुमचे आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल’, असे स्पष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा घटक हा शेतकरी आहे, अशा महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी याबाबतीत अत्यंत भावनिक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणुक करणे हे माझे काम आहे, त्याची संधी मला मिळालेली असुन तेच मी करत असल्याचेही यावेळी दादा भुसे यांनी नम्रपणे सांगितले.
आजवर काय झाले यापेक्षा येथुन पुढे काय करता येईल एवढाच मी विचार करत असल्याचे सांगतानाच माझ्यावर काही लोक टिका करतात, त्यांचे मी स्वागत करतो. लोकशाही असल्याने त्यांचे मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे असेही ते म्हणाले.
औरंगाबाद कृषी उत्पन बाजार समितीत खताच्या दुकानावर स्टींग आॅपरेशन करत धडाकेबाज कारवाई केल्यानंतर कृषीमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सूकता असल्याचे यावेळी दिसून आले.