२०१९ साली खासदार, ३९ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, ‘राजस्थानचे योगी’ बाबा बालकनाथ कोण आहेत..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जयपूर :- राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक गेहलोत यांची ‘जादूगिरी’ राजस्थानात चालली नाही. राज्यातील जनतेनं काँग्रेस ‘हात’ सोडून भाजपाच्या ‘कमळा’ला पसंती दिली आहे.
त्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा रंगली आहे. यातच ‘राजस्थानचे योगी’ अशी ओळख असलेल्या बाबा बालक नाथ यांचं नाव चर्चेत आलं आहे.
३९ वर्षीय बाबा बालकनाथ अलवर लोकसभा मतदारसंघातून २०१९ खासदार झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत बालकनाथ यांना तिजारा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी बालकनाथ यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं जातंय.
कोण आहेत बाबा बालक नाथ?
रोहतकमधील बाबा मस्तनाथ मठाचे प्रमुख म्हणून बालकनाथ हे प्रसिद्ध आहेत. बालकनाथ यांचा जन्म १६ एप्रिल १९८४ रोजी अलवरच्या कोहराना गावात झाला होता. वयाच्या ६ व्या वर्षी बालकनाथ यांनी घर सोडलं होतं. हिंदुत्वाच्या प्रश्नांवरून बालकनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे बालकनाथ सतत चर्चेत असतात.
राजस्थान निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले होते, तेव्हा मुख्यमंत्री कोणाला पसंती? असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता. त्यावेळी अशोक गेहलोत यांच्यानंतर बालकनाथ यांना पसंती मिळाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, बालकनाथ यांच्याबरोबर वसुंधरा राजे यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. वसंधुरा राजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आहेत.