“राज ठाकरेंना वैयक्तिक विरोध नाही”, ब्रिजभूषण सिंह यांचं पुण्यात विधान; म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या उपस्थितीत आज पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे विमानतळावर ब्रिजभूषण सिंह यांचं जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता म्हणाले की, मी आता महाराष्ट्र कुस्तीच्या कार्यक्रमाला जाणार आहे.
मला येथे येऊन छान वाटत असून महाराष्ट्राच्या जनतेकडून आजपर्यंत मला नेहमीच प्रेम मिळालं असल्याचं त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कुस्ती परिषदचे अध्यक्ष राहिले आहेत. तर तुम्ही त्यांना भेटणार का? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, कार्यक्रम कसा आहे. याबाबत मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तुमच्यात वाद पाहण्यास मिळाला. त्यामुळे आज देखील तुमची विरोधाची भावना आहे का? त्यावर ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले.